समुद्रपूर तालुक्यात शेतकरी-शेतमजूर संघर्ष

By Admin | Updated: September 13, 2014 02:08 IST2014-09-13T02:08:09+5:302014-09-13T02:08:09+5:30

गावातील शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात असल्याच्या कारणावरून चिडलेल्या शेतकऱ्यांनी मजुरांना वाहुन नेणाऱ्या वाहनांची तक्रार पोलीस ठाण्यात केली़ ...

Farmer-farming struggle in Samudrapur taluka | समुद्रपूर तालुक्यात शेतकरी-शेतमजूर संघर्ष

समुद्रपूर तालुक्यात शेतकरी-शेतमजूर संघर्ष

समुद्रपूर : गावातील शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात असल्याच्या कारणावरून चिडलेल्या शेतकऱ्यांनी मजुरांना वाहुन नेणाऱ्या वाहनांची तक्रार पोलीस ठाण्यात केली़ पोलिसांनी अवैध वाहतुकीच्या नियमावरून अशा वाहनावर कारवाई केली. यामुळे एका दिवसाचा रोजगार बुडाल्याचा आरोप करीत शेतमजूर महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत जोरदार घोषणाबाजी केली़ शेतमजुरीतील तफावतीमुळेच शेतकरी शेतमजूर यांच्यात हा संघर्ष पेटलेला आहे़
तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशीत गवताचे प्रमाण वाढले़ वाढलेल्या गवताबरोबरच मजुरीचे दरही वाढले़ शेतमजुरांनी जिथे जास्त मजुरी मिळेल तिथे मजुरीला जाण्याचे धोरण अवलंविले़ समुद्रपूर येथे १२० ते १३० रुपये मजुरी तर बाहेरगावी २५० ते २७० रुपये मजुरी मिळत असल्यामुळे गावातील शेकडो शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात आहोत. त्यामुळे समुद्रपूर येथील शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले़ गुरूवारी २० ते २५ शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सभा घेवून शेतमजूर महिलांना बाहेरगावी जाऊ द्यायचे नाही, असे ठरविले़ यासाठी मजुरांना वाहून नेणाऱ्या वाहनांची तक्रार ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस प्रशासनाने तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी ९ वाजता मजुरांना वाहून नेणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली़ त्यामुळे शेतमजूर महिलांना मजुरीकरिता जाता न आल्यामुळे एका दिवसाची मजुरी बुडाली़ शेतकऱ्यांनी जाणूनबुजून तक्रार केल्याचा प्रकार महिलांना माहिती झाल्यामुळे त्यांनी एकत्र येत ग्रा.पं.समोर घोषणाबाजी केली़
तेथून झेंडा चौकात येत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी समजाविल्या नंतर त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत तिथेही घोषणाबाजी केली़ त्यानंतर पोलीस ठाण्यात मजूरांचा मोर्चा दाखल झाला़ ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी महिलांना समजावित सायंकाळी शेतकरी व शेतमजूर यांची संयुक्त सभा घेवून यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला़ एका दिवसाचा रोजगार बुडाल्यामुळे हताश झालेल्यास शेतमजूर महिलांना शेवटपर्यंत कुणाला न्याय मागावा हे कळलेच नाही़ नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदील झालेला शेतकरी व रोजमजुरीवर पोट भरणाऱ्या शेतमजुरात संघर्षची चिन्हे दिसत आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer-farming struggle in Samudrapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.