लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या पिपरी (मेघे) परिसरात कोरोना लसीकरण केंद्र नसल्याने ज्येष्ठ लाभार्थींची फजिती होत आहे. लसीकरणासाठी आंजी येथील आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने उन्हाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पिपरी परिसरातच असलेल्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र देण्याची मागणी सरपंच अजय गौळकार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना निवेदनातून केली आहे.शहरालगत असलेल्या पिपरी ग्रामपंचायतीची लाेकसंख्या ४० हजारांवर आहे. लोकसंख्येनुसार ही ग्रामपंचायत मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. पिपरी मेघे गाव आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडले आहे. हे अंतर फार लांब आहे. त्यातच सामान्य रुग्णालयातील गर्दी पाहता, ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याचे दिवस पाहता, आंजी येथील लसीकरण केंद्रात जाणे ज्येष्ठांना गैरसोयीचे ठरत आहे. पर्यायाने लसीकरण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिपरी परिसरात कोरोना लसीकरण गतिमान करण्यासाठी व गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने पिपरी परिसरातील आरोग्य उपकेंद्रातच कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, गजानन वानखेडे, वैभव चाफले, राजेंद्र कळसाईत यांची उपस्थिती होती.
पिपरी गावाची लोकसंख्या पाहता, तेथे लसीकरण केंद्राची गरज आहेच. पण, रुग्णालयातील मनुष्यबळ, संगणक आदींचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. - डॉ. अजय डवले, जिल्हा आराेग्य अधिकारी.