शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट
By Admin | Updated: June 21, 2017 00:41 IST2017-06-21T00:41:40+5:302017-06-21T00:41:40+5:30
हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट
१,५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात : पाऊस बेपत्ता; जमिनीला भेगा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली. पेरणी केल्यावर एक पाऊस आला. यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे अंकुरले; मात्र यानंतर पाऊस बेपत्ता झाला असून बियाण्यांचे अंकूर करपणे सुरू झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात आल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी आलेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा बळावल्याने त्यांनी कपाशीची लागवड केली. अशातच हवामान खात्याने ११ जून रोजी मान्सून धडकणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेण्याच्या आशेपोटी कपाशीची लागवड केली. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे टाकलेले बियाणे अंकुरले. बियाण्यांच्या अंकुराला पावसाची गरज असताना पाऊस बेपत्ता झाला. परिणामी अंकुर करपत आहेत.
पाऊस आला नसल्याने जमिनीत टाकलेले काही बियाणे दबल्या गेले आहे. शेतातील निम्मे पिक करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिकलरच्या सहायाने पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे व सततच्या भारनियमनामुळे तेही करणे अडचणीचे ठरत आहे.
जर या दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती जिल्ह्यात आज निर्माण झाली आहे.