सेलू : शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षांला मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो. यंदा नव्या वर्षात प्रवेश करताना शेतकऱ्यांना जुन्या वर्षात आलेले अनुभव व त्याच्या आठवणी पुसता पुसत नाही, असे चित्र आहे. पहिले पावसाची प्रतीक्षा व नंतर अवकाळी पावसाने दिलेल्या जखमा ताज्या आहेत. या साऱ्या दुष्काळी परिस्थितीचे सावट गुढीपाडव्यावर दिसत आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी त्याच्या शेतात जावून त्याच्या मांडवाना आंब्याच्या पानांचे तोरण बांधून नवा सालकरी ठेवण्याची पद्धत आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सालकऱ्याचे साल ठरवून त्याच्या हातून मांडवाला तोरण बांधण्याचा आजपर्यंतची प्रथा आहे. यंदा मात्र शेतीत आलेल्या नुकसानामुळे बरेच शेतकरी सालकरी ठेवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे अधिक शेती आहे तेच सालकरी ठेवत आहे. यातही सालकऱ्याला देण्यात येत असलेल्या सालाबाबतही भावबाजी सुरू असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी गत वर्षी असलेल्या सालकऱ्यालाच पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्याला असलेल्या जुन्याच सालात काम करण्याचे बळीराजा बोलत आहे. यंदा आलेल्या दुष्काळाच्या स्थितीमुळे आर्थिक घडी विस्कटली असल्याचे अशी वेळ असल्याचे चित्र ग्रामीण भागात येत आहे. असे असताना सर्वच दु:ख विसरुन शेतकरी आपल्या कामाला लागल्याचे चित्र आहे. येत्या वर्षात तरी जुन्या वर्षाच्या आठवणी पुसल्या जाव्या असे शेतकऱ्याची इच्छा असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.(तालुका प्रतिनिधी)
गुढीपाडव्यावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: March 21, 2015 02:07 IST