Drought of facilities at world-famous Sevagram railway station | जगविख्यात सेवाग्राम रेल्वेस्थानकावर सुविधांचा दुष्काळ
जगविख्यात सेवाग्राम रेल्वेस्थानकावर सुविधांचा दुष्काळ

ठळक मुद्देफलाटांवरील पथदिवे बंद : स्वच्छतेचे तीनतेरा; प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा व सेवाग्राम रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे करण्याचा शासन गाजावाजा करीत असताना महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्रामातीलच रेल्वेस्थानकावर सद्यस्थितीत सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे. अतिमहत्त्वपूर्ण या स्थानकाच्या सुरक्षेच्या प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे.
सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्रामसह वर्ध्यात युद्धपातळीवर विकासकामे सुरू आहेत. गांधींच्या १५० व्या जयंतीपूर्वी ही सर्व कामे पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सेवाग्राम रेल्वेस्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी आहे. बापूंचे वास्तव्य राहिल्याने सेवाग्रामचा जगभरात नावलौकिक आहे. वर्षाकाठी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. मात्र, रेल्वेस्थानक सुविधांबाबत मागासल्याचेच वास्तव आहे. या रेल्वेस्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र त्या दिवसा नव्हे, तर रात्रच्या सुमारासच अधिक आहेत. असे असताना मागील काही महिन्यांपासून फलाट क्रमांक तीन आणि चारवरील दिवे बंद आहेत. येथे सायंकाळनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचाही वावर असतो. परिणामी, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असून भीतीयुक्त वातावरणात ते तासन्तास बसलेले दिसून येतात.
गांधीजयंतीदिनी गतवर्षी देशभर स्वच्छतेचे सोहळे साजरे झाले. ‘एक कदम स्वच्छता की और’ असे ब्रीद मिरवत स्वच्छतेला प्रारंभ झाला. आज मात्र, रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहेत.
स्वच्छतेअभावी शौचालयांमधून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे फलाटांवर गाडीच्या प्रतीक्षेत बसलेल्या प्रवाशांचा अक्षरश: श्वास गुदमरतो. स्थानकावरील जिन्याच्या कोपºयात पान-खºर्याच्या पिचकाºया दिसून येतात. काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. अस्वच्छतेच्या कारणावरून संबंधित कंत्राटदाराला दंडही ठोठावला. फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये अनागोंदी आढळून आल्याने संचालकांना खडसावले. अधिकाºयांनाही धारेवर धरले; मात्र मात्र, परिस्थिती सुधारली नाही.
प्रवाशांची सुरक्षाही वाऱ्यावर
अधिकतर गाड्या रात्रीच्या सुमारास राहत असताना रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असणे गरजेचे आहे. मात्र, स्थानकावर कधीच कर्मचारी शोधूनही सापडत नाहीत. काही वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. तेही इतिहासजमा झाले आहेत. फलाटांवर सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असते. अतिमहत्त्वाच्या सेवाग्राम रेल्वेस्थानकाची सुरक्षा अशी वाऱ्यावर आहे.
डिस्प्ले नाही
सरकारकडून डिजिटल इंडियाचा ढोल बडविला जात असताना फलाटावर शिवाय तिकीटघर परिसरात रेल्वेगाड्यांची स्थिती दर्शविणारा एलईडी डिस्प्ले नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांविषयी अनाउंन्सिंगदेखील केले जात नाही. यामुळे प्रवाशांना रेल्वेगाड्यांची नेमकी स्थिती कळत नसून ते गोंधळलेल्या अवस्थेत असतात. एकंदरीत स्थानकावर अनागोंदी कारभार सुरू आहे.
मोकाट श्वानांचा वावर
सेवाग्राम व मुख्य रेल्वेस्थानकाच्या आवारात आणि फलाटांवर सदैव मोकाट श्वानांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. मागील अनेक दिवसांपासूनची ही समस्या आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते. याकडे रेल्वेस्थानक प्रबंधक व इतर अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Drought of facilities at world-famous Sevagram railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.