वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. शैलेजासह कुमारसिंग कदम यांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 13:00 IST2022-02-07T12:56:40+5:302022-02-07T13:00:45+5:30
अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम आणि दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे, तर कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. शैलेजासह कुमारसिंग कदम यांना अटकपूर्व जामीन
वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत डॉ. कदम दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावार मंजूर केला. त्यामुळे १४ फेब्रुवारीपर्यंत तरी पोलीस त्यांना अटक करू शकणार नाही.
अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम आणि दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे, तर कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. डॉ. शैलजा कदम आजारी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, डॉ. शैलजा कदम आणि डॉ. कुमारसिंह कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार दोघांनाही १४ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कदम रुग्णालयाच्या परिसरात मानवी कवट्या आणि हाडे सापडली होती. तसेच बंद खोलीत ९७ लाख रुपयांची रक्कम आढळून आली होती. मात्र, ही रक्कम पेट्राेल पंपाची असून रुग्णालय जरी आमच्या नावाने आहे, पण आम्ही वयोवृद्ध असल्याने रुग्णालय चालवत नाही, असे त्यांनी सांगितले होते. उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात १४ फेब्रुवारीपर्यंत आपला ‘से’ पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत.
अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदमसह आरोपी डॉ. नीरज कदम आणि दोन पारिचारिका न्यायालयीन कोठडीत असून, डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम यांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन वेळा त्यावर सुनावणी झाली नाही. त्यावर आता बुधवारी, ९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.