चवळीच्या शेंगांना वर्धा जिल्ह्यात कवडीमोल भाव; दारोदार विकण्याची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:14 IST2020-05-16T14:14:11+5:302020-05-16T14:14:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे.

चवळीच्या शेंगांना वर्धा जिल्ह्यात कवडीमोल भाव; दारोदार विकण्याची पाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नजीकच्या जामणी येथील शेतकरी बाबा अतकरे यांनी ठेक्याने केलेल्या ४ एकर शेतातील अर्धा एकरात २० फेबु्रवारीला चवळीची लागवड केली. सध्या स्थितीत हे पीक चांगले बहरले असून झाडांना शेंगाही मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. आतापर्यंत या पिकासाठी १५ हजारांचा खर्च अतकरे यांना आला आहे. तीन दिवसाआड शेंगाचा तोडा केल्या जात आहे. १५ ते १७ मणाचे उत्पादनही होत आहे. परंतु, हा शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर काही व्यापाऱ्यांकडून किलोने तर काहींकडून ढिगाने त्याची खरेदी केली जात आहे. शिवाय कवडीमोल भाव दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांकडून अल्प भाव दिल्या जात असल्याने उत्पादीत झालेला हा माल सायकलवर लादून त्यांची परिसरातील तीन ते चार गावांमध्ये दारोदारी विक्री करण्याची वेळ आल्यावर आल्याचे शेतकरी अतकरे यांनी सांगितले.