Do not disconnect the power supply of any plumbing | कोणत्याही नळयोजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करु नका

कोणत्याही नळयोजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करु नका

ठळक मुद्देसुनील केदार : आठही तालुक्यांचा घेतला आढावा, जिल्हाधिकारी कार्यालयातही झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळा सुरू झाला असून या काळात ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्याकडे वीज देयक भरण्यास निधी नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही गावातील व शहरातील पाणीपुरवठा योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नका, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात.
कारोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आठही तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. कोरोना संसगार्मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत गरीब, मजूर, कामगार, छोटे दुकानदार, स्टॉलधारक ज्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर चालतो त्या सर्वांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यासाठी गावनिहाय शिधापत्रिका धारकांची यादी करताना गावातील शिधापत्रिका धारकांची संख्या, शिधा मिळणारे आणि न मिळणारे तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही मात्र ते शिधा मिळण्यास पात्र आहेत. तसेच रेशनकार्ड आहे मात्र, तांत्रिक कारणामुळे ज्यांना शिधा मिळत नाही, यासोबतच शिधा मिळण्यास अपात्र असणारे रेशनकार्ड धारक अशांची विभागणी करुन दोन दिवसात यादी तयार करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. यावेळी, आ. दादाराव केचे, रणजित कांबळे, पंकज भोयर, खा. रामदास तडस, माजी आ. अमर काळे हे त्यांच्या तालुक्यातील आढावा बैठकीला उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, सीईओ डॉ. सचिन ओम्बासे, एसपी डॉ. बसवराज तेली यांची उपस्थिती होती.

कृषी सेवा केंद्र सुरु ठेवावे
शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहेत. कृषी सेवा केंद्र जीवनावश्यक वस्तुंमध्ये समाविष्ट असल्यामुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचबरोबर दूध संकलन करण्यास टाळाटाळ करणाºया दूध डेअरीवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. दिनशा आणि मदर डेअरी यांचे दूध संकलन केंद्र बंद असल्यास थेट कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दुधाला शासन हमी दराने भाव देण्यात येतो की नाही याची तपासणी करण्यास सांगितले.
श्रावण बाळ, संजय गांधी आणि वृद्धापकाळ योजनेतील प्रलंबित अर्जदारांचे अर्ज तत्काळ निकाली काढावेत. अर्जातील त्रुटी पूर्ण करून मंजूर करण्यात यावेत. गॅस सिलिंडर जीवनावश्यक वस्तुंमध्ये समाविष्ट असल्यामुळे ग्राहकांची मागणी आल्यास २४ तासात संबंधित एजन्सीने घरपोच सिलिंडर पोहोचविण्यासंबंधी निर्देश द्यावे. साखर आणि डाळीची पुढील दोन महिन्यांची मागणी नोंदवावी त्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य यंत्रणेच्या कार्याचे केले कौतुक
जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व सरकारी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाºयांच्या कामाचे कौतुक केले. आज आपले डॉक्टर सैनिकांसारखे आघाडी सांभाळत आहेत याबद्दल त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभारही मानले.

Web Title: Do not disconnect the power supply of any plumbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.