किसान जागृतीच्या सभेत शेतकरी आत्महत्येवर चर्चा
By Admin | Updated: August 6, 2015 00:32 IST2015-08-06T00:32:39+5:302015-08-06T00:32:39+5:30
राष्ट्रीय किसान जागृती अभियानातील कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यात केंद्र सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाचा विरोध करण्यासाठी भजन सत्याग्रह करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

किसान जागृतीच्या सभेत शेतकरी आत्महत्येवर चर्चा
वर्धा : राष्ट्रीय किसान जागृती अभियानातील कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यात केंद्र सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाचा विरोध करण्यासाठी भजन सत्याग्रह करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून प्रचारक अभिमन्यू भारतीय उपस्थित होते.
विदर्भातील सत्ताधारी खासदार यांच्या घरी जाऊन हा भजन सत्याग्रह करण्यात येणार आहे. तसेच या विधेयकाला विरोध असल्याचे निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी सदस्यांना देण्यात आली.
यावेळी सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सरकारची भूमिका याचा निषेध करण्यात आला. तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्येविषयी जे बेजबाबदारपणाचे कथन केले, त्याचा निषेध निवेदनातून करण्यात आला. याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचा परिणाम म्हणून शेतकरी समुदायात आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या शेतकरी आत्महत्या पाहता वर्तमान सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांची गती वाढली असल्याचा सूर यावेली व्यक्त झाला.
सभेला विनोद बुधबआवरे, शरद मेहकर, योगीराज खांडेकार, आकाश खांडेकर, रमेश सोलव, प्रभाकर गाढवे, अतुल अमझरे यांची तसेच सदस्यांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)