भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:09 IST2019-05-14T22:08:14+5:302019-05-14T22:09:37+5:30
यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल........

भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या आहेत.
धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा न.प. प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १६ हजार कुटुंबियांना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागातील सुमारे १७ हजार कुटुंबियांना पाणी पुरवठा करते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने त्याला कसा आळा घालता येईल हे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होते. मंगळवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी पार पडलेल्या विशेष बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदर सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी बनकर, जि.प. सिंचन विभागाचे गहलोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता वाघ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गवळी, वर्धा पाटबंधारे विभागाचे एस. बी. काळे तसेच सर्व न.प.चे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी १५ सरपंचांशी साधला संवाद
सदर बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील १५ सरपंचाशी थेट संवाद साधला. यावेळी सरपंचांनी मुख्यमंत्री दरबारी आपल्या विविध मागण्या रेटल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरपंचांच्या सदर मागण्या पूर्णत्त्वास जाण्यासाठी काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल संबंधित अधिकाºयांनी ४८ तासात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गाळमुक्त धामविषयी चर्चाच नाही
भविष्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी धाम गाळमुक्त होणे गरजेचे आहे. परंतु, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महाकाळी येथील धाम प्रकल्प गाळमुक्त होण्यासाठी काय कार्यवाही केली जात आहे. तो किती दिवसांत गाळमुक्त होईल या विषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान धामच्या उंची वाढीचा विषयाची माहिती प्रधान सचिव चहल यांना देण्यात आली. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने काढलेल्या त्रुट्यांची पुर्तता सध्या केली जात असल्याचे यावेळी चहल यांना अधिकाºयांनी सांगितले.