69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:37 IST2017-12-13T15:34:29+5:302017-12-13T15:37:20+5:30
वर्धा- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
वर्धा- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 52 हजार 105 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 12 हजार 944 शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच 4 हजार 498 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवली जाईल.
योजनेच्या पारदर्शक कार्यवाहीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठा डाटाबेस शासनाकडे जमा झाला आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध राष्ट्रीयीकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली.
कर्जमाफीचे एसएमएससुद्धा शेतकऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे, असे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी सांगितले.
माझ्यावर जिल्हा सहकारी बँकेचे 48 हजार रुपयांचे कर्ज होते. त्याचे व्याज धरून एकूण रुक्कम 69 हजार रुपये झाली होती. पण सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मला कर्ज भरणे शक्य झाले नाही. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सर्व कर्ज माफी मिळाल्यामुळे माझा डोक्यावरचे मोठे ओझे कमी झाले आहे, यासाठी मी शासनाचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया कारंजा तालुक्यातील नारा येथील दत्तू रघुनाथ खौशीम व्यक्त केली. ठाणेगाव येथील शेतकरी वासुदेव चरडे यांनी 39 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांगितले. कर्ज फेडण्यासाठीची चिंता सातत्याने होती. मात्र शासनाने कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.