संततधार पावसाने पिकांचे नुकसान
By Admin | Updated: August 7, 2015 02:00 IST2015-08-07T02:00:06+5:302015-08-07T02:00:06+5:30
गत दोन दिवसांत मुसळधार पावसाने आष्टीसह तालुक्यात प्रचंड नुकसान केले.

संततधार पावसाने पिकांचे नुकसान
अनेक घरांत शिरले पाणी : कपाशी ३ हजार तर सोयाबीनची ५ हजार एकरात हानी
आष्टी (श.) : गत दोन दिवसांत मुसळधार पावसाने आष्टीसह तालुक्यात प्रचंड नुकसान केले. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड, नदी व नाल्याच्या काठावरील पुरामुळे जमिनी खरडून गेल्यात. यामुळे शेतकऱ्यांना हातचे पीक गमविण्याची वेळ आली आहे. गुरूवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पुर्ववत होत आहे. अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते. यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे.
लहानआर्वी गावाला लागून वाहणाऱ्या वीरभद्रा नदीने पुरामुळे उग्ररूप धारण केले होते. नदी काठावरील शेतातील पिके खरडून गेलीत. वाघाडी नाल्याला पुरामुळे भगदाड पडल्याने लहानआर्वी, अंतोरा मार्गे जाणारी वाहतूक बंद झाली होती. रस्त्यापर्यंतचा भाग खरडून गेल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. कालव्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण झाली आहे. माणिकनगर मौजातील विद्युतची डीपी पाण्यामुळे वाकली आहे. डीपीजवळील खांबही वाकले आहे. डीपीच्या बॉक्सचे झाकण चोरट्यांनी लंपास केल्याने धोका निर्माण झाला आहे. कैदास नाल्याला पुराचे पाणी आल्याने भगवंत कोहळे, नामदेव जावतकर, संजय शेंडे, निळकंठ कोहळे यांची पऱ्हाटी खरडून वाहून गेली आहे.
बेलोरा येथील शेतकरी मनोहर जाणे, चिरकुट बोरवार यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बेलोरा ते अप्पर वर्धा धरण रस्त्यावरील देवडागचा पूल व किशोर जाणे यांच्या शेताजवळच्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
वीज वितरण कंपनीचे शेकडो खांब वाकल्याने व तारा तुटल्याने दोन दिवसांत विद्युत पुरवठा बंद होता. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. घरांची पडझड झाल्याने नागरिकांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नुकसानग्रस्त भागाची तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदी संयुक्तरित्या पाहणी करीत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. प्रत्येक गावातील नाल्या व गटारे मोकळी झाली आहे. गुरूवारी ढगाळ वातावरण होते; पण पाऊस नसल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)