४०० हेक्टरवरील पिके गेली खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:22+5:30

मौजा जुना अंतोरा येथील शेतकरी प्रशांत पांडे यांच्या सर्व्हे नंबर १४६ मधील शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे पीक वाहून गेले. मौजा चिंचोली येथील शेतकरी अमोल अमझरे यांचे शेत सर्व्हे क्रमांक १३५ खरडून गेल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे.

The crop on 2 hectares is gone | ४०० हेक्टरवरील पिके गेली खरडून

४०० हेक्टरवरील पिके गेली खरडून

ठळक मुद्देआष्टी तालुक्यात पावसाचा कहर : घरांची पडझड, महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टीसह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक गावांतील घरांचे व मौजातील शेतपिकांचे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत तालुक्यात ४०० हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली. यात कपाशी, तूर, सोयाबीन ही प्रमुख खरिपाची पिकेही वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी आलेले नाही, अशी माहिती आष्टी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी केला आहे.
मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरण ९५.७९ टक्के भरले आहे. नदीकाठावरील बेलोरा, गोदावरी, टेकोडा, भारसवाडा, भिष्णूर, खडका, बेलोरा खुर्द, चिंचोली, शिरसोली, अंतोरा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अप्पर वर्धा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गेल्या आठवडाभरात अप्पर वर्धा धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
मौजा जुना अंतोरा येथील शेतकरी प्रशांत पांडे यांच्या सर्व्हे नंबर १४६ मधील शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे पीक वाहून गेले. मौजा चिंचोली येथील शेतकरी अमोल अमझरे यांचे शेत सर्व्हे क्रमांक १३५ खरडून गेल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे.
मौजा चिंचोली येथील शेतकरी लोमेश मानकर यांच्या सर्र्व्हे क्र. ९९/१ वाघाडी नाल्याच्या पुरामुळे चार एकर शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे खरडून गेलेले आहे. तालुका कृषी विभागाने वाघाडी नाला खोलीकरणाचे काम जलयुक्त शिवार अभियानमधून केले. मात्र, काम किती मीटर खोल केले, याची कुठलीही माहिती कृषी विभागाने दिली नाही. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे पुराचे पाणी येताच नाल्याने न वाहता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि गावातील घरांमध्ये शिरले. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांची पडझड झालेली आहे. मात्र, कृषी विभागाने कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. अंतोरा, लहानआर्वी या भागामध्ये सर्वाधिक शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. शेती पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केलेली आहे.

पावसाने खोळंबली शेतीकामे
घोराड - सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम कसा होणार याची चिंता वाटू लागली होती; पण सततचा पाऊस सुरू असल्याने पुन्हा त्या चिंतेत भर पडली आहे. शेतीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.
पट्टा पद्धतीची कपाशीची पेरणी असल्याने व सततच्या पावसामुळे डवरणी होऊ शकत नाही. अशातच शेतातील पीक निंदण करण्यासाठी मजूर कसे न्यावे, ही विवंचना आहे. मजूर शेतात पोहोचताच पाऊस येत असल्याने घरी परतावे लागते. अशातच शेतात जाण्यायेण्याचा खर्च व अर्धी मजुरी द्यावे लागत असल्याने आता शेतकºयांनी तणनाशकाचा वापर सुरू केला आहे. कपाशीला रासायनिक खताची मात्रा देण्यासही अडचण निर्माण होत आहे. शेतात असलेल्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीपालावर्गीय पिकाचे उत्पादन कमी झाले आहे, तर सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या आहे. सततच्या पावसाने शेंगांची काय परिस्थिती होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
श्रावणमासाला सुरुवात झाली तेव्हापासून तर आज एक महिन्याहून अधिक काळ झाला असताना पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर पावसामुळे शेतात काम करणाºया मजूरवर्गाला पाहिजे त्या प्रमाणात काम नाही. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कटत आहे.
एकंदरीत या पावसामुळे शेतातील कामांचा खोळंबा व शेतातील पिकापासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हाती येणार की नाही, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.

नुकसानाचा आकडा फुगतोय
जिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने आगमन झाले. काही भागात अद्याप संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक नद्यांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने हे पाणी थेट शेतात अथवा गावांमध्ये शिरत आहे. यात पिकांचे नुकसान तर घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अनेक भागातील हजारो हेक्टरमधील पिके खरडून वाहून गेली आहेत. तर संततधारेमुळे काही शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. पीक पाण्याखाली आल्याने जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्याप शासकीय यंत्रणेकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली नाही. शेतकºयांना सर्वेक्षणाची याशिवाय आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील पीक व अन्य नुकसानाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाºयांनी सर्वेक्षणाबाबात संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याची मागणी होत आहे.

Web Title: The crop on 2 hectares is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.