वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेने मशीनद्वारे केबल टाकण्याचे कंत्राट मुंबई येथील एका कंपनीस दिले; पण सदर कंपनीचा कंत्राटदार व मजूर रस्ते खोदून केबल टाकत आहेत़ याबाबत हटकले असता एका नगरसेवकाला मारहाण करण्यात आली़ याविरूद्ध नगरसेवकांनी शहर पोलिसांत तक्रार दिल्याने वचपा काढण्यासाठी सदर कंत्राटदाराने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे़ यावरून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रवीण हिवरे व सुमारे १६ नगरसेवकांनी शहरात सुरू असलेल्या केबल टाकण्याच्या कामावर आक्षेप घेतला़ सदर काम बंद करण्याचा प्रयत्न केला; पण कंत्राटदार अरेरावीची भाषा वापरत होता़ शिवाय नगरसेवक सोहनसिंग ठाकूर यांना मारहाणही करण्यात आली़ यामुळे नगरसेवकांनी शहर पोलीस ठाण्यात रविवारी (दि़१४) तक्रार दाखल केली़ शिवाय सदर कामाच्या चौकशीची मागणी केली़ या तक्रारीनंतर सोमवारी (दि़१५) कंत्राटदार राकेश भरतसिंग यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. यात पालिकेची परवानगी घेऊन केबल टाकण्याचे काम सुरू असताना ते बंद करण्यास सांगण्यात आले़ शिवाय ५० हजार रुपयांची खंडणीची मागणी करून शिवीगाळ करीत मारहाणही केल्याचे तक्रारीत नमूद आहे़ या तक्रारीवरून शहर पोलिसांनी नगरसेवक सोहनसिंग ठाकूर, अटल पांडे व प्रवीण हिवरे यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत़ वास्तविक बांधकाम थांबविले तेव्हा दोन्ही गटाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. सदर कंपनीने दिलेल्या तक्रारीत खंडणी व मारहाणीचा उल्लेख नव्हती. मात्र नंतर कंपनीकडून खंडणी मागितली व मारहाण केल्याची तक्रार करण्यात आल्याने ही तक्रार कितपत खरी, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बांधकाम विभाग व नगरपरिषदेने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
कंत्राटदाराच्या तक्रारीवरुन तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा
By admin | Updated: December 15, 2014 23:01 IST