कापूस बाजारात येताच क्विंटलमागे ६०० रुपयांची घट
By Admin | Updated: October 30, 2016 00:59 IST2016-10-30T00:59:40+5:302016-10-30T00:59:40+5:30
मराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला.

कापूस बाजारात येताच क्विंटलमागे ६०० रुपयांची घट
व्यापाऱ्यांचा प्रताप : शेतकऱ्यांची होतेय मुस्कटदाबी
फणिंद्र रघाटाटे रोहणा
मराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला. हा भाव कायम राहील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला; पण विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस निघून तो खासगी व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी येताच त्यात ६०० रुपयांची घट करण्यात आली. ४९०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी सुरू केली आहे. याउपर आम्ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिकच देत आहे, अशी मल्लीनाथी करायला व्यापारी विसरले नाहीत.
मराठवाड्यात अल्प प्रमाणात कापूस पिकत असला तरी विदर्भाच्या तुलनेत तेथे कापूस आधीच निघतो. परिणामी, मराठवाड्यात कापसाची खरेदी आधी सुरू होते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्यावेळी कापसाचा घटता पेरा व उत्पादनातील घटीमुळे हे भाव हंगामाच्या शेवटपर्यंत कायम राहतील, असा अंदाज शासकीय तज्ज्ञ व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता; पण प्रत्यक्षात आता विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येऊ लागला आहे. शासन हमीभावाने १५ नोव्हेंबरनंतर कापूस खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांसाठी शासकीय खरेदी कुचकामी ठरणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात झालेला खर्चही भरून न निघालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी नुकताच वेचून आणलेला कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
वर्धा, वायगाव व सेलू येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली. पहिल्या दिवशी ५ हजार १५१ रुपये भावाने कापूस घेण्यात आला; पण दोन दिवसांत भाव ४ हजार ९०० पर्यंत खाली आणले. किमान काही दिवस तरी मराठवाड्यातील कापूस खरेदीचा भाव विदर्भातील शेतकऱ्यांना मिळेल, ही अपेक्षा मृगजळ ठरली. भाव एवढे कमी का, असे कापूस उत्पादकांनी विचारताच व्यापारी, अहो आम्ही शासनापेक्षा आठाणे अधिकच देत आहे, यात समाधान माना, अशी मल्लीनाथी करतात. यंदा कापसाचा पेरा कमी व लाल्याच्या प्रभावाने उत्पादनात मोठी घट येणार, हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. आज व्यापारी ज्या कापसाला पाच हजारही भाव द्यायला तयार नाही, त्याच कापसावर व्यापारी प्रक्रिया करवून सरकी व रूईगाठी विकल्यावर त्यांना खर्च वजा सहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळणार, हे देखील निश्चितच खोटे नाही. म्हणजे उत्पादक उपाशी अन खरेदीदार तुपाशी, हे वास्तव यंदाही प्रत्ययास येणार असल्याचेच दिसते.