शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:12+5:30
शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे.

शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकºयांना साधारण उत्पन्न झाले. परंतु, शेतातील पीक हातात येत असताना कोरोनाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पाडली. खरिप हंगाम तोंडावर आला असताना बि-बियाणे खरेदी, शेतीच्या मशागतीसाठी पैसा शेतकºयांकडे उपलब्ध नाही. शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.
बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिळेल त्या भावात पिकविलेला माल व्यापाºयांना विकत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन व्यापारी माल खरेदी करत आहे. पिकविलेल्या मालापेक्षा मजुरांचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या भावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना येण्याजाण्याचा ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
लागवडीची सोय नाही
आज तालुक्यात सालगड्याचे साल एक लाख २५ हजार आहे. माणसाची रोजी ३५० रूपये, डवरण २५० रूपये, फवारणी दर ३०० रुपये आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बँका कर्ज देऊ शकत नाही. पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर कुटुंब असल्याने शेती करावी लागते. दुसरा व्यवसाय नाही. संस्था अध्यक्ष, सचिव यांच्याकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहे. थकीत असल्याने कर्जही देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही लागवडीची सोय करता आली नाही.
एकरी २६ हजारांचा खर्च
नांगरणी खर्च दीड हजार रुपये, वखरणी २०० रूपये, रोटावेटर १ हजार २०० रूपये, पेरणी ४०० रूपये, शेणखत ६ हजार रुपये, रासायनिक खत पाच हजार, औषधी ६ हजार, वेचणी ६ हजार, थ्रेशर १ हजार, हमाली व माल घरी येईपर्यंत १ हजार ५०० रुपये तसेच रासायनिक खतांचा खर्च असा एकूण २६ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च करताना शेतकऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.