जिल्ह्यात कोरोना मृत्युसंख्येने ओलांडली हजारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:16+5:30
देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती.

जिल्ह्यात कोरोना मृत्युसंख्येने ओलांडली हजारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असून, दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत्युसंख्येने हजारी ओलांडल्याचे दिसून येत आहे.
देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत गेली. चाचण्यांची गती मंदावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात होती. यावर्षी मार्च महिन्यापासून काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. कोरोनाचे संकट आणखी गडद झाले.
चाचणीसाठी आतापर्यंत ३ लाखांवर स्त्राव नमुने पाठविण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ७२९ वर पोहोचली असून, पूर्वी एक अंकी असणारी मृत्युसंख्या आता दोन अंकी झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ६ हजार ८७७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्रदिनी १ मे रोजी तब्बल १,१४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. २ मे रोजी ८२२, ३ मे रोजी ३००, ४ मे रोजी ६३०, ५ मे रोजी ९६३, ६ मे रोजी ९०५, ७ मे रोजी ७६६, ८ मे रोजी ९९४ रुग्ण आढळूून आले, तर कोरोना मृत्युसंख्येने हजारचा पल्ला ओलांडला आहे.
त्रिसूत्रीचे कोटेकोरपणे पालन गरजेचे
कोरोनाने शहरातच नव्हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता पाळेमुळे रुजविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, वर्षभरात १ हजार जणांचा काेरोनाने बळी घेतला आहे. संकट आणखी गडद होत असल्याने कारोना प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांनी आता काटेकोरपणे पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.