शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्याकरिता पाटचऱ्यांचे काम पूर्ण करा
By Admin | Updated: December 19, 2015 02:05 IST2015-12-19T02:05:43+5:302015-12-19T02:05:43+5:30
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा.

शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्याकरिता पाटचऱ्यांचे काम पूर्ण करा
मुख्यमंत्र्यांच्या सूचना : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा
वर्धा : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतांना निम्न वर्धा प्रकल्पामधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी तातडीने पाटचाऱ्यांचे काम सुरू करा. तसेच या प्रकल्पांंतर्गत येणाऱ्या लिंबोळथी व दौलतपूर या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाची कारवाई एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील आजनसरा, लालनाला, बोरधरण, शिरूड प्रकल्प, धाम प्रकल्पाच्या उंची वाढविण्यासंबंधीचे प्रस्ताव तत्काळ सादर करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचेही ते म्हणाले.
सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करताना रमाई घरकुल योजना, शबरी योजना, इंदिरा आवास योजनेसह लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन घरकुलाचे एकत्र बांधकाम करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना स्वत: घर बांधकामाला प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही यावेळी केल्यात.
सिंचन प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच वनक्षेत्रात असलेल्या गरमसूरसह इतर गावांना जोडणारे रस्ते वनविभागाच्या सहकार्याने जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण करण्यात यावेत. टंचाई परिस्थतीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करताना टंचाई आराखड्यानुसार तयार केलेल्या योजना तात्काळ पूर्ण करा यासाठी आवाश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात माहिती देऊन कालबद्ध कार्यक्रमानुसार सिंचन, वीज, रस्ते विकास, ग्रामविकास व टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून वर्धा जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीततील निर्णयासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.(प्रतिनिधी)
सेवाग्राम विकास आराखड्याला प्राधान्यक्रम
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र राहिलेल्या सेवाग्राम तसेच परिसराच्या विकासासोबतच महात्मा गांधी यांच्या विचाराचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
सेवाग्राम विकास आराखड्यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती करण्यात आली. हा प्रकल्प महात्मा गांधी यांच्या आगामी १५० व्या जयंती वर्षापूर्वी पूर्ण व्हावा यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी पंपाना वीज जोडणे, नादुरूस्त रोहित्र बदलणे यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.