वर्धा : जिल्हा वार्षिक योजनेमधून विविध योजनांसाठी विभाग प्रमुखांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा उपलब्ध निधी खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी विभाग प्रमुखांची असून विकास कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा बैठकीत केल्या.जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी सर्व विभागांच्या विकास कामांचा खर्च व विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये विकास कामे घेतांना विकास कामासंदर्भातील संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक असताना विभागप्रमुखांकडून माहिती उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१५-१६ या वर्षासाठीच्या नियोजनासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. २०१५-१६ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या पहिल्या बैठकीतच खर्चाचे बाबनिहाय नियोजन निधी प्राप्त होण्याआधी ठेवायचे असल्याने विभाग प्रमुखांकडून निश्चित कालावधीत खर्चाच्या बाबींचे नियोजन आवश्यक असल्याचे डायरे यांनी यावेळी सांगितले.जिल्हा वार्षिक योजनेमध्ये विभागांनी प्रस्तावित केलेल्या व मंजूर झालेल्या योजना संदर्भात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरूवात करून मुदतीपूर्वी निधी खर्च करण्याच्या सूचना डायरे यांनी यावेळी केल्या. या बैठकीला कृषी, पाटबंधारे, पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय, वन विभाग, डीडीआर, डीआरडी, पंचायत, जि.प., ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, खादी ग्रामोद्योग, शिक्षण, रेशीम, क्रीडा, रस्ते, ग्रंथालय, विद्युत, नगरपरिषद, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा वार्षिक योजनांची कामे निश्चित कालावधीत पूर्ण करा
By admin | Updated: December 13, 2014 02:10 IST