मुलाच्या मृत्यूचे प्रकरण पोलिसांनी दडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:24 IST2019-07-20T22:22:43+5:302019-07-20T22:24:07+5:30
तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूचे प्रकरण पोलिसांनी दडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा सेवाग्राम पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, हे प्रकरण दडपले, अशी तक्रार मृताची आई विमल गजानन जाधव यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याप्रकरणी योग्य तपास करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व आपल्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी म्हणून आपल्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शंकर गजानन जाधव हा ५ जून रोजी हरिलाल चव्हाण यांच्या घरी लग्न कार्यासाठी डेकोरेशन कंत्राटदार सुभाष वानखेडे यांच्यासोबत गेला होता. रात्री ९.३० वाजतादरम्यान डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी सेवाग्राम पोलिसांनी गावात येऊन चौकशी केली. यावेळी सदर डीजे वायर काढून पोलीस ठाण्यात नेला; मात्र नंतर संबंधिताला परत करण्यात आला. या प्रकरणात मातेचे बयाण नोंदवून घेण्यात आले नाही. पोलिसांनी परस्पर मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाला, अशी खोटी अशी माहिती नोंदविली. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे, असे विमल जाधव यांनी या निवेदनात म्हटले आहे. मुलाच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विमल जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून दाद मागणार असल्याचेही विमल जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.