प्रमाणित सोयाबीनला बोगस बियाण्याचा दर्जा
By Admin | Updated: July 3, 2014 23:43 IST2014-07-03T23:43:22+5:302014-07-03T23:43:22+5:30
मागील वर्षी भरपूर पाऊस आला़ सोयाबीन पिकाला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला़ शेतकऱ्यांनी कमी भावाने सोयाबीन दलालांकडे विकली़ आता यावर्षी पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कृषी अधिकाऱ्यांकडून

प्रमाणित सोयाबीनला बोगस बियाण्याचा दर्जा
आष्टी (श़) : मागील वर्षी भरपूर पाऊस आला़ सोयाबीन पिकाला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला़ शेतकऱ्यांनी कमी भावाने सोयाबीन दलालांकडे विकली़ आता यावर्षी पेरणीसाठी सोयाबीन बियाणे कृषी अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून विकण्यासाठी कृषी सेवा केंद्रात आले आहे; पण कृषी अधिकारी शेतकऱ्यांना सदर बियाणे बोगस असून त्याची उगवण क्षमता काहीच नाही, असा चुकीचा संदेश देत आहेत़ यामुळे आधी सोयाबीन विक्रीला परवानगी दिली कशी, असा प्रश्न कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित करीत आहे़
वर्धा जिल्ह्यात १७० कृषी सेवा केंद्र आहेत़ या सर्व केंद्रांमध्ये खरिपात पेरणी करण्याकरिता सोयाबीन बियाणे दाखल झाले आहे़ कृषी सेवा केंद्र संचालकांनी आपापल्या आर्थिक शक्तीनुसार प्रमाणित कंपन्यांकडून बियाण्यांची उचल केली़ शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वीच जिल्हा परिषद कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द्वयांनी शेतकऱ्यांना आवाहन केले़ बोगस सोयाबीन बियाण्यांपासून सावध राहावे, बियाणे उगवणार नाही, शेती पडीत राहिल, पैशाची नाहक उधळपट्टी होईल, असा सल्लाही देऊन टाकला़ याची जिल्ह्यात झपाट्याने प्रसिद्धी झाली़ शेतकरी सावरला तर बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले़
आजच्या घडीला जिल्ह्यात ९२ टक्के सोयाबिन बियाण्यांच्या बॅग जशाच्या तशा पडून आहेत़ शासनानेच प्रमाणित केलेले सोयाबीन शेतकऱ्यांना दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे़ केंद्र व राज्य शासनाकडून अधिकृत परवाना घेऊन मोठ-मोठ्या कंपन्यांनी सोयाबीन बियाणे तयार केले़ पॅकींग झाल्यावर बियाणे विक्रीसाठी आल्यानंतर कृषी अधिकारी बोगस बियाणे असल्याची जाहीर वक्तव्ये करीत आहेत़ कंपन्यांचेच सोयाबिन कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी येते़ असे असताना अधिकारी बोगस सोयाबीन असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे़
या प्रकारामुळे आता शेतकरी कृषी सेवा केंद्र धारकांना सोयाबीनची गॅरंटी आहे काय, उगवले नाही तर पैसे परत करणार काय असे लेखी लिहून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत़ कृषी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे़ याचा त्रास कृषी केंद्र धारकांना सहन करावा लागत असून शेतकरीही संभ्रमात सापडला आहे़ अधिकाऱ्यांना सल्ला ऐकावा की कृषी केंद्र चालकांवर विश्वास ठेवून बियाणे खरेदी करावे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(प्रतिनिधी)