वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर एकही गतिरोधक लावण्यात आले नाही. यामुळे शिवाजी पुतळा ते बजाज चौकपर्यंतच्या मार्गावर दिवसाला एक तरी अपघाताची घटना घडते. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहनांची गती अधिक राहत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठित घेवूनच चालावे लागते. या मार्गावर असलेल्या प्रमुख पाच चौकात गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता ताराचंद चौबे यांच्यासह शिष्टमंडळाने दिले आहे. शिवाजी चौक ते बजाज पुतळ्यापर्यंतचा मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर बाजारपेठ व बॅँकेची कार्यालये असल्याने नागरिकांचा राबता असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने यासमोर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला मर्यादा येते. यातच वाहनांची गती अधिक राहत असल्याने रस्ता ओलांडणाऱ्या किंवा रस्त्याने चालत जात असलेल्या व्यक्तीचा चांगलाच गोंधळ उडतो. यात वाहनांना अपघाताच्या किरकोळ घटना घडत असतात. येथील सोशालीस्ट चौक, ठाकरे मार्केट, बढे चौक ही स्थळे तर अपघात प्रवणच घोषित करण्याची स्थिती आहे. चारही बाजूने वाहने समोरासमोर येत असून गती अधिक राहत असल्याने अपघात घडतात. रस्ता ओलांडताना वृध्दांची फारच ताराबंळ उडते. या वाहनांच्या गतीला वेळीच आवर घालण्यासाठी गतिरोधक लावणे आवश्यक आहे. अन्यथा नाहक एखाद्या पादचाऱ्याला जीव गमावण्याची वेळ येवू शकते. वाहनांची गती अधिक ठेवण्यास बंधन असले तरी वाहन चालकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. पोलीस कर्मचारी कारवाई करीत नसल्याने वाहन चालकांवर कोणतेच निर्बंध नसतात. बरेचदा ‘धुम’ स्टाईलने स्टंट करतानाही आढळतात. या प्रकाराला चाप लावण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
मुख्य मार्गावर गतिरोधक तयार करा
By admin | Updated: December 16, 2014 22:58 IST