भाजपा नगरसेवकाच्या घरातील वाहने पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:47 IST2018-08-26T22:46:38+5:302018-08-26T22:47:11+5:30
येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

भाजपा नगरसेवकाच्या घरातील वाहने पेटविली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणी तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक देशकरी यांच्या मालकीची एम. एच. ३२ एक्स. ६९९३ आणि एम. एच. ३२ ए. डी. ४१४१ क्रमांकाची दुचाकी त्यांच्या घराच्या आवारात उभी होती. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या आवारात प्रवेश करून सदर दोन्ही वाहनांना आग लावली. दरम्यान पायऱ्यांवरून कुणीतरी धावत असल्याचे भासल्याने दिनेश देशकरी यांच्या पत्नीने आरडा-ओरड केली. त्यामुळे घरातील इतर सदस्यही जागे झाले. दोन्ही वाहने पेटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत दोन्ही दुचाकी जळाल्याने दिनेश देशकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आग लावणारे दोघे होते. त्यांनी नंदोरी चौकाकडे पळ काढला, अशी चर्चा परिसरात होती. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.