घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची पाण्यामुळे वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:25 IST2019-07-30T23:25:03+5:302019-07-30T23:25:20+5:30
धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची पाण्यामुळे वाताहत
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्याने शेतशिवार जलमय झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील नांदोरा (डफरे), दिघी (बोपापूर) व सोनेगाव (बाई) या नदीकाठच्या गावांना बसला.
दिघी (बोपापूर) रसत्यावरील यशोदा नदी व बाजूचा नाला जलमय झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. नदीचा व नाल्याचे पाणी एक झाल्याने शाळेकरी मुले आणि नागरिक पुरात अडकले होते. तसेच सोनेगाव (बाई) मार्गावरील नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद झाली होती. चार पदरी रस्ता व पुलाचे बांधकाम उंच असल्याने शिरपूर गावात पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नसल्याने अनेकांच्या घरात दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. धान्य व संसारोपयोगी साहित्य भिजल्याने संध्याकाळच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला.
अनेकांचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यांनी प्लास्टीकचा कागद आंथरुन संसार थाटला होता. काहींनी आजुबाजुच्या घरांचा आसरा घेवून तर काही किरायाचे घरात दिवस काढत आहे.
या योजनेअंतर्गत देवळीत आठशे घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. परंतु बºयाच लाभार्थ्यांना निधीचे हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. अशा लाभार्थ्यांची या पावसामुळे चांगलीच वाताहत झाली.
पुलगाव ते कळंब मार्ग बंद
नाचणगाव- दोन दिवसापासून संततधार पावसाने परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुलगाव ते कळंब मार्गावरील सोनोरा फाटा येथील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पावसामुळे सर्वत्र नाले धो-धो वाहायला सुरुवात झाली. सध्या शेतातील कामांनाही ब्रेक लागला असल्याने शेतमजूर घरीच आहे. परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक बाहेरगावावरुन ये-जा करतात. आज संततधार पाऊस असल्याने पुरामुळे अनेक शिक्षक शाळेत पोहोचलेच नाही. त्यांना नाल्याचा पूर पाहूनच परत जावे लागले.