वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST2021-07-09T05:00:00+5:302021-07-09T05:00:16+5:30

जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे.

Baliraja is pleased with the grace of Varun Raja | वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : जिल्ह्यात ७३.२३ मि.मी.पावसाची नोंद, नदी-नाल्यांना आला पूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतीपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू होती. काही भागात सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जगण्याचा आधार दिला जात होता. अशातच बुधवारी रात्रीपासून वरुणाची कृपादृष्टी झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. सेलू तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने जयपूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातील नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणी निर्माण झाली होती. 

सिंदी-दहेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प
- सिंदी (रेल्वे): बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजतापासून सुरु झालेल्या पावसामुळे सिंदी-दहेगाव मार्गावरील पिपरा गावातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती. थोडाही पाऊस आला तरी या नाल्याला पूर येत असल्याने नांगरिकांसह शेतकऱ्यांना दरवर्षीच पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. येथील नारिकांनी अनेकदा या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी आमदार, खासदारांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने समस्या कायम आहे. आतातरी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.

सेवाग्रामातील मेडिकल चौक झाला जलयम
- सेवाग्राम: बुधवारी सायंकाळपासून परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकत होते. या पावसामुळे शेतशिवारातील विहीर, नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीतही भर पडली आहे. तसेच या पावसामुळे मेडीकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसातून वाहन काढताना ते आडवे होत होते. या साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांच्या अंगावर चिखल उडाल्याने संतापही व्यक्त होत होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने पुढे काय? असा प्रश्न दिनेश पवार व दिलीप शेंद्रे आदी नागरिकांनी व्यक्त केला. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे केली जात असून अद्यापही ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. मेडीकल चौकातील नालीचे काम आणि रस्त्याचे काम रेंगाळले असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे या चौकात तलाव साचला आहे.

 

Web Title: Baliraja is pleased with the grace of Varun Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.