In Arvi taluka, crops hit over 3,000 hectares | आर्वी तालुक्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

आर्वी तालुक्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
देउरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल ३ हजार ३८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा काही अंदाज नसतानाही रात्री साडेनऊ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास दीड तास चालेल्या या वादळीपावसाने तालुक्यातील गहू, चणा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसादरम्यान देउरवाडा व आर्वीतील उलापूर नाका परिसरात बोराच्या आकाराची गार पडल्याने घरावरील कवेलू फुटले. मजुरांअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचा गहू व चणा उभा असून काहींनी सवंगणी करुन शेतातच ढिग मारुन ठेवला आहे. या पावसाने गहू व चणा भिजल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाला सुरुवात होताच विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय झाली. शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाईलची बॅटरी सुरु करुन त्या प्रकाशात रुग्णांची काळजी घेतली. रुग्णालयातील जनरेटरही या काळात सुरु केले नव्हते तसेच कर्मचाºयांनीही रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचे रुग्णांचे नातेवाईक राजेश शिरघरे यांनी सांगितले. वादळामुळे ग्रामीण भागातील घरांचे छत उडाल्याने नुकसान झाले. वाढोना येथील शंकर देहाडे यांच्या घराचे छत उडाल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला आहे. विरुळ परिसरातही मोठा फटका बसला असून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती. या परिसरातील संमृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कॅम्पचे शेड उडाल्याने कपडे, अन्नधान्य व इतर साहित्य भिजले आहे. बुधवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली.

या वादळी पावसाने गहू आणि चणा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरेही बाधित झाल्याची माहिती असून प्रत्येक मंडळातून माहिती घेणे सुरु आहे. सायंकाळपर्यंत पूर्ण माहिती कार्यालयाला प्राप्त होईल.
- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आर्वी.

Web Title: In Arvi taluka, crops hit over 3,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.