आर्वी काँग्रेस, हिंगणघाट भाजप तर वर्धा व देवळीत संभ्रम

By Admin | Updated: October 16, 2014 23:28 IST2014-10-16T23:28:26+5:302014-10-16T23:28:26+5:30

मतदानानंतर चारही विधानसभा क्षेत्रातून कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल. यांचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी रंगत असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Arvi Congress, Hinganghat BJP and Wardha and Deoliat Paranoid | आर्वी काँग्रेस, हिंगणघाट भाजप तर वर्धा व देवळीत संभ्रम

आर्वी काँग्रेस, हिंगणघाट भाजप तर वर्धा व देवळीत संभ्रम

चर्चेतील सूर : उमेदवारांच्या भवितव्याबाबत आकडमोड सुरू
राजेश भोजेकर -वर्धा
मतदानानंतर चारही विधानसभा क्षेत्रातून कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल. यांचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी रंगत असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चारही मतदार संघात अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्याने नेमका कोणता उमेदवार निवडून येईल. याबाबत बांधल्या अंदाजानुसार आर्वीत काँग्रेस तर काहींच्या आकडे मोडीनुसार भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. देवळीत तिरंगी लढत झाल्याचे अंदाज बांधले जात आहे. यामध्ये भाजप निवडून येणार अशी चर्चा असताना काहींच्या आकडेमोडीनुसार काँग्रेस चवथ्यांदा निवडून येईल. हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपात लढत झाल्याचे बोलले जात असून भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यातही भाजपला झुकते माप दिले जात आहे. वर्धेत बहुरंगी लढत झाली यामध्ये भाजपला वरचढ स्थान दिले जात आहे. काँग्रेसही बाजी मारू शकते. अशी चर्चा असताना काहीजण राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपाच्या विजयचीही गणिते मांडत आहे. परिवर्तन आणि मोदी लाट चालली तर चारही मतदार संघात कमळ फुलतील, असे चित्र आहे.
आर्वीत थेट लढतीत काँग्रेसला संधी
आर्वी मतदार संघात काँग्रेसचे अमर काळे आणि भाजपाचे दादाराव केचे यांच्यात काट्याची टक्कर बघायला मिळाली. गेल्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेवून अमर काळे यांनी चुकांवर कटाक्ष ठेवून ही निवडणूक लढली. दुसरीकडे दादाराव केचे अतिविश्वास बाळगून निवडणुकीला सामोरे गेले. काहींच्या मते, ही निवडणूक पक्षाला गौण माणून व्यक्ती भोवती फिरल्यामुळे अमर काळे यांना विजयाची संधी अधिक आहे, तर मोदी लाट चालली तर दादाराव केचे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यातही राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष बाळा जगताप यांनीही चांगलीच मजल मारली होती. मतांचे हे विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे आहे, असेही भाकीत वर्तविले जात आहे. एकूण चर्चेचा आधार घेता येथे काँग्रेसचे अमर काळे यांना विजयाची संधी असल्याचा सूर आहे.
हिंगणघाट चौरंगी लढतीत भाजपकडे कल
हिंगणघाट मतदार संघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, शिवसेनेचे अशोक शिंदे आणि बसपाचे प्रलय तेलंग यांच्यात काट्याची लढत झाली. यामुळे विजयाचा सारीपाट मांडणे अवघड झाले आहे. २००९ च्या निवडणुकीत समीर कुणावार यांची विजयाची संधी अल्पमतांनी हुकली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच निवडून द्यायचे, असे एकूण वातावरण होते. त्यांच्यासोबत राजकीय मंडळींच्या औदासिन्यामुळे दुखावलेला मोठा मतदार गट होता. मात्र युती तुटल्याने त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढल्यामुळे अनेक मतदार त्यांच्यापासून दूर झाले. परिणामी बसपाचे प्रलय तेलंग यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसने उषाकिरण थुटे यांना निवडणुकीत उतरविल्यामुळे निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ सक्रीय झाला. याचा फटका शिवसेनेला बसतील, अशी चर्चा आहे. यासोबत तरूण वर्गावर मनसेचे अतुल वांदिले यांनी छाप पाडल्यामुळे शिवसेनेचे तरूण मतदार त्यांच्यासोबत गेले. याचाही फटका शिंदे यांना फटका बसला. एकूणच शिवसेना बॅकफूॅटवर आली तरीही शिंदे नेहमीप्रमाणे राजकीय खेळी खेळून मतांचा आकडा कायम ठेवण्यात महावीर ठरले, तर त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. राजू तिमांडे यांना गेल्या निवडणुकीत मतदारांनी डावलले होते. तरीही त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. जनतेच्या समस्यांना घेवून प्रशासन आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबाबत असलेली असुया संपुष्टात आली. त्यात त्यांच्या मतांचे विभाजन होताना दिसले नाही. यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचे दिसून येते. बसपाचे प्रलय तेलंग यांनी प्रचारात कमालीची आघाडी घेतली होती. त्यांनी हिंगणघाटात चांगली मजल मारली असे बोलले जात आहे. ग्रामीण भागात त्यांनी चमत्कार केला तर तेही विजयाच्या जवळ असल्याचे गणित मतदानानंतर मांडणे सुरू झाले आहे. एकूणच चर्चेचा सूर बघता परिवर्तनाच्या लाटेवर भाजपाचे समीर कुणावार यांच्या विजयाची आशा वाढली आहे.

Web Title: Arvi Congress, Hinganghat BJP and Wardha and Deoliat Paranoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.