आर्वीत महिनाभर सिंचन होईल एवढेच पाणी!
By Admin | Updated: December 9, 2015 02:28 IST2015-12-09T02:28:23+5:302015-12-09T02:28:23+5:30
यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला.

आर्वीत महिनाभर सिंचन होईल एवढेच पाणी!
पाण्याचा उपसा वाढला : उपविभागात ३५ टक्केच जलसाठा
सुरेंद्र डाफ आर्वी
यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. यामुळे रबी हंगामात पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाल्याने पाण्याचा उपसा वाढला. आजच्या स्थितीत उपविभागातील जलसाठ्यात ३५ टक्के पाणी आहे. असलेले पाणी सिंचनाकरिता एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याची माहिती आहे.
उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा अशी तीन तालुके आहेत. या तालुक्यात १७ लघुतलाव आहेत. आर्वीत सहा, कारंजा १० तर आष्टीत एक तलाव आहे. आर्वी तालुक्यात १५ पाझर तलाव, १३ गावतलाव आहे. या १३ गावतलावांपैकी सात हिवाळ्यातच कोरडे झाले आहेत. या सर्व तलावात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. आर्वी तालुक्यातील सालधरा, गोंडखैरी, काकडधरा, गौरखेडा, दहेगाव (गोंडी), पाचोड, तरोडा, किन्हाळा, चांदणी, पिंपळझरी, हुसेनपूर, पिंपळझरी खैरी, पांजरा बो. खानापूर, सालधरा, परसोडी, रामपूर, अजनगाव, पिंपळगाव (भोसले) आदी लघुतलावांचा समावेश आहे.
कारंजा तालुक्यात १३ पाझर तलाव पाच गाव तलाव व ३४ कोल्हापूरी बंधारे आहेत. आर्वी तालुक्यात २६ कोल्हापूरी बंधारे आहेत. त्यापैकी फक्त सात बंधाऱ्यात पाणी आहे, तदर कोरडे पडले आहे. आष्टी तालुक्यात एक दोन पाझर तलाव, पाच गाव तलाव व एक कोल्हापूरी बंधारा आहे.
आर्वीत गत वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने लघुतलाव शंभर टक्के भरले होते. यावर्षी मात्र येथील जलायशये ५० टक्केही भरले नाही. फक्त एक महिना पुरेल एवढाच जलसाठा येथे असल्याची माहिती आहे.
यावर्षीच्या अल्प पावसाचा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फटका व ताण सहन करावा लागला. यात रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्याअभावी पाण्याचा उपसा दुप्पट वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाली. रब्बीच्या पिकांना या उपविभागातून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु यावर्षी रब्बी हंगाम उलटून एक महिलाच झाला आहे. अशात या जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाण्याअभावी रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. ऐन हिवाळ्यातच येथील जलसाठे कोरडे पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलाव कोरडे पडल्याने अनेक उपविभागात पाणी टंचाईचे निर्माण झाले आहे.