आॅनलाईन कार्यपध्दती ठरते त्रासदायक
By Admin | Updated: June 22, 2017 00:39 IST2017-06-22T00:39:24+5:302017-06-22T00:39:24+5:30
नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे.

आॅनलाईन कार्यपध्दती ठरते त्रासदायक
दाखल्यांकरिता पालकांची धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रवेशाकरिता लागणारे दाखले व कागदपत्रे मिळविताना पालकांना मात्र चांगलीच पायपीट करावे लागत आहे. सर्व शासकीय सेवा आॅनलाईन करण्यात आल्या असून लिंक फेल असल्यास कागदपत्र मिळत नाही. सद्यस्थितीत आॅनलाईन प्रणाली नागरिकांकरिता डोकेदुखीची ठरत आहे.
येथील नायब तहसीलदार कार्यालयात श्रावळबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकूल योजनेचे लाभार्थी, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमीलेअर दाखला, शेतीचा फेरफार, सातबाराचा उतारा याकरिता विद्यार्थी, पालकांसह शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कधी नायब तहसीलदाराची अनुपस्थिती तर कधी लालफितशाहीचे धोरण यामुळे या कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. प्रशासनातील सर्व सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. प्रवेश परीक्षेचे अर्ज असो किंवा नोकरीचा अर्ज, पोलीस स्टेशनची तक्रार असो किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज, सातबाराचा उतारा देखील आॅनलाईन मिळतो. याकरिता नायब तहसीलदार कार्यालयात ग्रामदुत सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवा केंद्रात अत्याधुनिक सुविधा असून आवश्यक दस्ताऐवज मिळविता येतात. विविध प्रमाणपत्रासाठी शासकीय नियमानुसार शुल्क आकारले जाते. मात्र येथील सेतू केंद्रात नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारण्यात येत असल्याची ओरड पालक करीत आहे. या संदर्भात नायब तहसीलदार उल्हास राठोड यांच्यासोबत चर्चा केली असता शासकीय शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारले जात होत असेल तर कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आॅनलाईन सेवेतील व्यत्ययामुळे नागरिकांची डोकेदुखी कमी होत नसल्याचे दिसते.
नागरिकांना मनस्ताप
शाळा प्रवेशासाठी प्रवेश अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडावी लागतात. याकरिता तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उबंरठे झिझवावे लागत आहे. आॅनलाईन सेवा सुरू करुनही हा प्रकार कायम आहे. आॅनलाईन कार्यपध्दतीमुळे कागदपत्र मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.