शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी
By Admin | Updated: November 24, 2014 23:03 IST2014-11-24T23:03:03+5:302014-11-24T23:03:03+5:30
खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी
मुख्यमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
हिंगणघाट : खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला़ यासाठी शेतकऱ्याला कृषी केंद्र धारकांसह सावकारांचे कर्ज करावे लागले़ शेतकरी आर्थिक संकटात असल्याने शासनाने एकरी २५ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले़
पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनची पेरणी दीड महिना उशिरा झाली़ मध्यंतरी पावसाच्या गैरहजेरीने सोयाबीनचे संपूर्ण पीक नेस्तनाबूत झाले़ यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० किलो, १०० किलो, १५० किलो असा उतारा मिळाला़ सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही भरून निघू शकला नाही़ यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे़ काही शेतकऱ्यांनी शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगण्याचे कामच ठेवले नाही. पिकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारातच गेली.
कापसाच्या बियाण्यांची दुबार-तिबार पेरणी करावी लागली़ उशिरा लागवड केल्याने खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पूरेसे पाणी मिळाले नाही. आॅगस्ट व सप्टेंबरच्या १५ तारखेपर्यंत पाऊस आला़ त्यानंतर २ महिन्यांपासून आजपर्यंत पाऊसच आला नाही. यामुळे कपाशीच्या पिकाची जमीन फाकली असून किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पठारी रानावरील कपाशीचे पीक सुकलेल्या अवस्थेत आहे. तुरीचे पीकही किडीच्या प्रादुर्भावाने खराब झाले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे़ शासनाने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा़ प्रभावित झालेले तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून मदत करावी, अशी मागणी तिमांडे यांनी निवेदनातून केली़(तालुका प्रतिनिधी)