Allergies to Employees for Delivery of Home Cylinders | घरपोच सिलिंडर देण्याची कर्मचाऱ्यांना एलर्जी
घरपोच सिलिंडर देण्याची कर्मचाऱ्यांना एलर्जी

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जाते : सिलिंडरचे वजनही केल्या जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : घरपोच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याच्या नावाखाली २५ ते ३० रूपये भरलेल्या सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांकडून जास्त वसुल केले जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात नाही. भरलेले सिलिंडर घरापर्यंत नेण्यास या कर्मचाऱ्यांना मदत मागितली असता हे माझे काम नाही असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाते. प्रसंगी अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे ग्राहकांना गॅसने भरलेले अवजड सिलिंडर घरापर्यंत नेण्याकरिता कसरत करावी लागते. यात महिला व वृध्दांची मोठी परवड होत आहे.
सिंदी (रेल्वे) येथील ‘श्री जी’ गॅस एजन्सीव्दारे केळझरसह १० ते १५ गावांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केल्या जातो. याकरिता चारचाकी वाहनातून ड्रायव्हरसह दोन कर्मचारी गावागावात जाऊन गॅस सिलिंडरचे वाटप करतात. वाहनचालका व्यतिरीक्त दुसरा कर्मचारी वाहनातून ग्राहकांना गॅस भरलेले सिलिंडर देण्याचे व रिकामे सिलिंडर वाहनात ठेवण्याचे काम करतो. या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी अरेरावीची भाषा वापरल्या जात असल्याने ग्राहकांमध्ये सध्या या कर्मचाºयाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. गॅस सिलिंडर वितरित करणारे कर्मचारी नागरिकांना रस्त्यावर सिलिंडर देऊन देतात. बरेच नागरिक ते सिंलिंडर रस्त्यावरून घरगळत आपल्या घराकडे नेतात. यात वयोवृध्द नागरिक, महिला यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो.

सिलिंडर वाहतूक करणारे वाहनही असुरक्षित
ग्राहकांना गॅसने भरलेले सिलिंडर देतेवेळी सिलिंडरचे वजन करूनच ते ग्राहकांना देण्याचा नियम असतांना या कर्मचाऱ्यांडून किंबहुना ‘श्री जी’ गॅस एजन्सीकडून सिलिंडरचे वजन करून ग्राहकांना दिल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला दिले गेलेल्या सिलिंडर मध्ये गॅस कमी तर नाही ना ? अशी शंका ग्राहकांमध्ये असते.
ज्या वाहनातून गॅस सिलिंडरची ने-आण केल्या जाते त्या वाहनाचा रंग निळा असावा व वाहनात अग्निशामक यंत्र असावे असा नियम आहे. परंतु याठिकाणी यासर्व नियमांची पायमल्ली होतांना दिसते. यासर्व मनमानी कारभाराकडे जिल्हा पुरवठा विभागाकडून हेतूपुरस्पर कानाडोळा केल्या जात आहे. ‘श्रीजी’ गॅस एजन्सीने ग्राहकांशी उध्दट वर्तणूक करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर लगाम लावण्याची मागणी ग्राहकांकडून केल्या जात आहे.

Web Title: Allergies to Employees for Delivery of Home Cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.