दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:28 IST2019-07-28T22:27:42+5:302019-07-28T22:28:02+5:30
गांधी जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे दारूचे पाट वाहतात, परिणामी, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. येत्या काळात शहरातील सर्वच दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार, अशी माहिती नव्यानेच रुजू झालेले अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधी जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे दारूचे पाट वाहतात, परिणामी, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. येत्या काळात शहरातील सर्वच दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार, अशी माहिती नव्यानेच रुजू झालेले अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होते. वर्धा शहरात दररोज चोरट्या मार्गाने दारूसाठा दाखल होतो. या व्यवसायात हजारांवर हात गुंतले आहेत. यामुळेच गुन्ह्यांचा आलेखदेखील वाढताच आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्या कार्यकाळात या व्यवसायावर पोलिस विभागाने बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले. त्यांच्या बदलीनंतर मागील काही वर्षांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दारूविक्रीला उधाण आले आहे. वर्धा पोद्दार बगीचा परिसरात राजेश जयस्वाल याने कित्येक वर्षांपासून बंद खोलीत बार थाटला आहे. त्यामुळे दिवसा, इतकेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत मद्यपींची येथे रेलचेल पाहायला मिळते. या बारमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. पोलिस विभागाला या बारविषयी माहिती आहे. मात्र, आजवर कारवाई करण्यात आली नाही. जयस्वाल याच्या बारवर अविनाशकुमार यांच्या काळात कारवाई झाली. त्यानंतर तब्बल सात-ते आठ वर्षांनंतर शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशावरून नव्यानेच रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. यानंतर दारूविक्रेत्यांवर अव्याहतपणे कारवाई केली जाईल, असेही मोरे यांनी सांगितले.
शहरात पोद्दार बगिचा परिसरासह विक्रमशीलानगर, पँथर चौक, इंदिरानगर, आदिवासी कॉलनी, कृष्णनगर आदी ठिकाणी अनेकांनी बंद खोलीत बार थाटल्याची गोपनीय माहिती मिळाली असून याविषयी नागरिकांच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. लवकरच या दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याचे संकेतही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीची ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, असे सांगतानाच पोलिस विभागात गुन्हे दाखल असलेल्या जुन्या दारूविक्रेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत जिल्ह्यातून दारू हद्दपार करणार करण्याकरिता कठोर पावले उचलली जाणार आहेत.
- नीलेश मोरे, अपर पोलिस अधीक्षक, वर्धा