वर्धा : शहरात रोज अनेक अपघात घडतात; पण ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा उक्तीप्रमाणे अपघात झाला असे म्हणून अनेक जण निघून जातात. त्याने मात्र अपघात झालेल्या मित्रांना तातडीने आॅटोतून सावंगी रुग्णालयात दाखल करून सर्व प्रक्रिया पार पाडत त्यांच्या घरच्यांनाही कळविले. अवघ्या १४ वर्षीय आदित्य एस. कुमार या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १० डिसेंबरचा सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आदित्यचे दोन मित्र भुवन पाथर्डे आणि अविलाश साठोणे हे दोघे दुचाकीने शिकवणी वर्गाला येत होते. दरम्यान अल्फोंसा शाळेजवळ ते दोघेही एक खांबावर आदळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. आदित्यच्या डोळ्यासमोरच हा अपघात झाला. आजुबाजूच्या नागरिकांनीही ते बघितले; पण त्या दोघांना वाचविण्यासाठी कुणीही आले नाही. आदित्यही मदतीची याचना करीत होता. त्याकडेही दुर्लक्ष केले. धीर न सोडता आदित्यने दोघांना स्वत: उचलून एका आटोत टाकत सरळ सावंगी रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांना स्वत: संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्याने अपघाती मित्रांच्या घरच्यांना कळविलेच नाही तर एकाच्या आईला स्वत: रुग्णालयात घेऊन आला. स्वत:कडील पॉकीटमनीच्या पैशाने दोघांसाठी चिप्स आणि दुधाच्या बाटलही आणल्या. घरचे रागवतील म्हणून तीन दिवस शिकवणी बुडवून त्याने मित्रांची सुश्रूषा केली. नुकतीच त्या मुलांना सुट्टी झाली असून त्यांचे आईवडील आदित्यचे आभार मानत आहेत. मुलाचा अभिमान असल्याचे आदित्यचे वडील सलील कुमार सांगतात.(शहर प्रतिनिधी)
मित्रांचा जीव वाचवून आदित्यने दिला जिंदादिलीचा परिचय
By admin | Updated: December 15, 2014 23:06 IST