Accident on a police vehicle | पोलीस वाहनास अपघात
पोलीस वाहनास अपघात

ठळक मुद्देआर्वी मार्गावरील घटना। चालक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मो.) : भरधाव असलेले पोलिसी वाहन अनियंत्रित होत उलटले. हा अपघात आर्वी मार्गावरील वाढोणा-पिपळखुटा दरम्यान शनिवारी दुपारी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. सदर पोलिसी वाहनाने आरोपींना न्यायालयात नेले जात होते. दरम्यान हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून अटक केलेल्या निळकंठ बापूराव उईके रा. सालधरा, किसना राठोड रा. चांदणी, किशोर भाऊराव दुर्गे रा. सावद, रोषण विष्णू तेलघरे रा. येळाकेळी तर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केलेल्या नाना शेषराव करणाके रा. पाचोड या आरोपींना आर्वी येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यासाठी खरांगणा पोलिसांची चमू एम. एच. ३२ जे. २१९ क्रमांकाच्या पोलिसी वाहनाने घेऊन जात होती. भरधाव वाहन आर्वी मार्गावरील वाढोणा परिसरात आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन उलटले. यात वाहनचालक शशिकांत मुंडे, राजेश थोटे, गौरव नासरे तर आरोपींना इजा झाल्या. मुंडे, थोटे व नासरे यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमी आरोपींना आर्वीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खरांगण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी घटनास्थळ गाठले होते.

Web Title: Accident on a police vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.