शेतात वीज कोसळून महिला जागीच ठार, तीन गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 19:32 IST2024-09-26T19:31:20+5:302024-09-26T19:32:44+5:30
जुवाडी शिवारातील घटना, गावकऱ्यांनी घेतली तातडीने शेताकडे धाव

शेतात वीज कोसळून महिला जागीच ठार, तीन गंभीर जखमी
वर्धा : शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिला जागीच ठार झाली. इतर तीन शेतमजूर महिला गंभीर, तर दोघी किरकोळ जखमी झाल्या. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास नजीकच्या जुवाडी शिवारात घडली.
मंदा प्रभाकर वाघमारे (५५), रा. जुवाडी, असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे पत्नी मंदा आणि पाच महिला शेतमजूर घेऊन गुरुवारी सकाळी शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास अचानक जुवाडी परिसरातील शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
यावेळी सगळेच शेती कामात व्यस्त होते. अचानक कडाडणारी वीज शेतात कोसळली. यात मंदा प्रभाकर वाघमारे जागीच ठार झाल्या. अर्चना तुकाराम दाभेकर (३६), किरण लती वाल्हे (३०) आणि उर्मिला दिलीप कोल्हे (३२) सर्व रा. जुवाडी यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, दोन महिला मजुरांनादेखील किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.