७०२ शेतकऱ्यांना नाकारला पीक विमा
By Admin | Updated: June 22, 2017 00:28 IST2017-06-22T00:28:03+5:302017-06-22T00:28:03+5:30
खरीप व रबी हंगामातील पिकांना विम्याचे कवच मिळावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे.

७०२ शेतकऱ्यांना नाकारला पीक विमा
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नोटीस : १४.७५ कोटी रुपये कंपनीच्या घशात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप व रबी हंगामातील पिकांना विम्याचे कवच मिळावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. यात जिल्ह्यातील ९६ हजार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला; पण जिल्ह्यातील केवळ २०९ प्रकरणांत विम्याचा लाभ देत ७०२ शेतकऱ्यांना विमा नाकारणत आला. ९ लाख ७५ हजार ८५ रुपये देत उर्वरित १४.७५ कोटी रुपये विमा कंपनीने हडप केले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला नोटीस दिला आहे.
निसर्गाची अवकृपा झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात होती. मागील वर्षीपासून ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना नावाने राबविण्यात येत आहे. २०१६-१७ या वर्षातील वर्धा जिल्ह्याचे पीक विम्याचे काम रिलायन्स विमा कंपनीकडे सोपविण्यात आले होते. जिल्ह्यातील ९६ हजार १७९ कर्जदार, गैरकर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता अदा केला. यापोटी विमा कंपनीला तब्बल १४ कोटी ८५ लाख रुपयांचा हप्ता पोहोचता झाला आहे. या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास संबंधित कंपनीने विम्याचा लाभ देणे क्रमप्राप्त होते; पण सदर कंपनीने शेतकऱ्यांचे १४ कोटी ७५ लाख २४ हजार ९१५ रुपये हडप केल्याचेच दिसून येत आहे.
पीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील ९११ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. कृषी विभागाच्या माध्यमातून याबाबत कंपनीकडे प्रस्तावही सादर करण्यात आले होते. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी नसले तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याची मुभा देण्यात आली होती; पण आता कंपनी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. ९११ शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना जिल्ह्यातील केवळ २०९ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ देण्यात आलेला आहे. याप्रकरणी कंपनीकडून ९ लाख ७५ हजार ८५ रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे. उर्वरित ७०२ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवित विम्याचा लाभ नाकारण्यात आला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे १४.७५ कोटी रुपये विमा कंपनीच्या घशात गेले, हे वास्तव आहे. या प्रकरणी कृषी विभागाने पाठपुरावा चालविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्यात. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला नोटीस जारी करीत जाब विचारला आहे.
सात गावांतील शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा
हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा, हिरापूर, धर्मापूर, वेळा, गोजी, रायफुली व दत्तापूर या गावांमध्ये १० आॅक्टोबर २०१६ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला होता. यामुळे पंचनामा, पाहणीनंतर प्रस्ताव पाठविले. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत भरपाई मिळण्याबाबत ठरावही पारित केला; पण या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला नाही. माजी जि.प. सदस्य मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत भरपाईची मागणी केली आहे.
विमा कंपनीकडे ९११ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील केवळ २०९ प्रस्ताव कंपनीने मंजूर केले असून ९ लाख ७५ हजार ८५ रुपयांची भरपाई दिली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांकरिता पाठपुरावा सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कंपनीला नोटीस पाठविला आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
२८ शेतकऱ्यांचेच कंपनीने केले सर्वेक्षण
पंतप्रधान पीक विमा योजनेचे काम सोपविलेल्या रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा केवळ हप्ता गोळा केला. यातील १४.८५ कोटी रुपये हडप करण्याचा मनसुबा असलेल्या कंपनीने प्रारंभी केवळ २८ शेतकऱ्यांच्या शेतात प्रतिनिधी पाठवून सर्वेक्षण केल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.