५४७ शेतकरी घेतात भाजीपाल्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:27+5:30

सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.

547 farmers take vegetable production | ५४७ शेतकरी घेतात भाजीपाल्याचे उत्पादन

५४७ शेतकरी घेतात भाजीपाल्याचे उत्पादन

ठळक मुद्देहिंगणघाट ठरतेय हब : प्रभावी नियोजन झाल्यास सुटणार भाजीकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांचा हा निर्णय थोडा कठोर मात्र महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भाजीकोंडी होऊ नये यासाठी बुधवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना योग्य नियोजनासह प्रभावी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची गाव निहाय माहिती गोळा केली. जिल्ह्यातील ५११ गावांमधील ५४७ शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असल्याचे यातून पुढे आले आहे.
वर्धा तालुक्यातील १२ गावांमधील ४५ शेतकरी विविध प्रकारचा १६२.२० क्विंटल, कारंजा तालुक्यातील २६ गावांमधील ५५ शेतकरी ३९२.४० क्विंटल, देवळी तालुक्यातील १४ गावांमधील ४१ शेतकरी ३५४.५ क्विंटल, सेलू तालुक्यातील १२ गावांमधील ५७ शेतकरी १५६८.९७ क्विंटल, समुद्रपूर तालुक्यातील १४ गावांमधील ३५ शेतकरी ४१३ क्विंटल, हिंगणघाट तालुक्यातील २१७ गावांमधील २०० शेतकरी ३५३६.३७ क्विंटल, आर्वी तालुक्यातील २०४ गावांमधील ५२ शेतकरी ४५७.२० क्विंटल तर आष्टी तालुक्यातील १२ गावांमधील ६२ शेतकरी २३१०.१० क्विंटल विविध प्रजातींच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.

भविष्यातील नियोजन गरजेचे
कोरोनाविरुद्धची लढाई पुढील काही महिने सुरू राहील असे सांगण्यात येत आहे. याच काळात जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाल्याची कोंडी वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून कृषी विभागाने आताच भविष्यातील संकट लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

या नाशवंत शेतमालाचे होतेय जिल्ह्यात उत्पादन
जिल्ह्यात कांदा, नाममात्र स्वरूपात बटाटा, टमाटर, अद्रक, हिंरवी मिर्ची, गवार, वाल, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, मेथी, सांबार, वांगी, चवळी, भेंडी, ढेमस आदी भाजीपाल्याचे उत्पादन सध्या वर्धा जिल्ह्यात होत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात होत आहे. भविष्यात भाजीकोंडी होऊ नये म्हणून कृषी सहाय्यकांच्या मदतीने भाजीपाला उत्पादक व व्यापारी, अडते तसेच दलाल यांची साखळी तालुकास्तरावर करण्यात येत आहे. शिवाय प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कुणी कामात कुचराई करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: 547 farmers take vegetable production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.