४५८ कृषी केंद्रांची झाली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:33+5:30
जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे.

४५८ कृषी केंद्रांची झाली तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शिवाय विविध बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असल्या तरी कुठल्याही परिस्थितीत बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली असून २ जून पर्यंत जिल्ह्यातील ४५८ कृषी केंद्राची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. सध्या बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकरी गर्दी करीत आहे. याच बियाणे खरेदीदरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकासह कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आतापर्यंत ४५८ कृषी केंद्रांवर छापा टाकून दुकानांची तपासणी केली आहे. शिवाय ही तपासणी मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
गिरड अन् हिंगणघाटात आढळले बोगस बियाणे
गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून गिरड येथील एका दुकानातून कपाशीचे ३ किलो बियाणे आणि हिंगणघाट येथील एका दुकानातून कपाशीचे दहा पाकिट बियाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हे बियाणे बोगस आहे काय याची शहानिशा करण्यासाठी त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत २७ मे रोजी पाठविण्यात आले आहे. पण अद्यापही प्रयोगशाळेचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही.
जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र
वर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. त्यापैकी ४५८ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित कृषी केंद्राची तपासणी येत्या दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अधिकाऱ्यांना करावी लागेल तक्रार
कपाशीच्या बियाण्यांबाबत काही तक्रारी असल्यास शेतकºयांना उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे त्याची तक्रार करता येणार आहे. तर तूर, सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांना ती तालुका कृषी अधिकारी किंवा पं.स. कृषी विभागाकडे करता येणार आहे.
गिरड व हिंगणघाट येथून जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. लवकरच आम्हाला अहवाल प्राप्त होईल अशी अशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कृषी केंद्र चालकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून बियाणे, खत व औषधींची विक्री करावी. शिवाय बियाण्यांबाबत काही अडचणी असल्यास कृषी विभागाकडे शेतकºयांनी तक्रारी कराव्या. वेळीच तक्रारीची दखल घेतली जाईल.
- अनील इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.