४२९ संसाराच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी
By Admin | Updated: August 19, 2015 02:15 IST2015-08-19T02:15:09+5:302015-08-19T02:15:09+5:30
लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते; मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते.

४२९ संसाराच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी
महिला तक्रार निवारण केंद्राचे कार्य : जिल्ह्यात चार केंद्रातून चालतो कारभार
गौरव देशमुख वर्धा
लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते; मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते. वाद विकोपाला जाऊन विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संसाराला नवसंजीवनी देण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयायातील महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आलेले आहे. या केंद्रातून यंदाच्या वर्षातील सात महिन्यात विस्कटलेल्या ४२९ संसाराच्या गाठी पुन्हा जोडण्यात आल्या आहेत.
या केंद्राने जानेवारी ते जुलै या सात महिन्यात तुटणाऱ्या संसाराची घडी बसवित त्यांना ‘नांदा सौख्य भरे’ हा कानमंत्र दिला. पती-पत्नी संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या गाळात रूतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो. थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोहोचते. अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. तेथील फेऱ्या मारण्यातच काळ सरतो. नवरा बायको सोबतच त्यांच्या मुलांसह दोन्हीकडील कुटुंबाचीही वाताहत होते. शिवाय या दोन कुटुंबामध्ये निर्माण झालेले वैर आयुष्यभर राहते. छोट्या-छोट्या कारणामधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभावाने वाढत जातात. रेशीमगाठीचे बंध गळून पडतात. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्राची संख्या चार आहे. वर्धा जिल्ह्यातील तक्रार निवारण केंद्रामध्ये सेलू, हिंगणघाट, कारंजा हे तीन समुपदेशन केंद्र तसेच वर्धा येथे मुख्य केंद्र आहे.
या तीन समुपदेशन केंद्रासह वर्धेच्या मुख्य महिला तक्रार निवारण केंद्रातील जानेवारी ते जुलै या सात महिन्यामध्ये दाखल झालेल्या ९२० तक्रारींपैकी ४२९ जणांच्या संसाराची घडी बसवण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्धा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख शुभांगी वानखडे, मंदा ढवळे, सविता मुडे, वर्षा नगरकर व इतर महिला कर्मचारी तक्रारदाराचे समुपदेशन करून संसार तुटल्यावर होणारे परिणाम, त्याची गंभीरता, रागाच्या भरात घेण्यात येणार निर्णय याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
या सात महिन्यात एकूण ९२० अर्ज दाखल झाले आहेत. यातील ४२९ अर्ज समुपदेशनाने निकाली काढण्यात आले आहेत. यातील ४१० प्रकरणे प्रलंबित आहेत. २२ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महिलावर होणाऱ्या स्वास्थ अधिकार कौटुंबिक हिंसाचार २००५ नुसार न्यायालयात एकूण ५९ प्रकरणे दाखल करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.