३०:५४, ५०:५४ चा निधी जिल्हा परिषदेतच पहिली सर्वसाधारण सभा : मुख्य विषयांवर चर्चा
By Admin | Updated: June 22, 2017 00:28 IST2017-06-22T00:28:57+5:302017-06-22T00:28:57+5:30
भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली.

३०:५४, ५०:५४ चा निधी जिल्हा परिषदेतच पहिली सर्वसाधारण सभा : मुख्य विषयांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली. या पहिल्याच सभेत निधीच्या पळवा-पळवीवर चाप लावत ठराव घेण्यात आला. या ठरावानुसार आता ३०:५४ व ५०:५४ शिर्षाखालील निधी खर्च करण्यासह कामेही जिल्हा परिषदच करणार आहे.
जिल्हा परिषदेचा ३०:५४, ५०:५४ शिर्षाखालील निधी, कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्याचे प्रयत्न होते. हा मुद्दा सभेत उपस्थित करीत तत्सम ठरावच पारित करण्यात आला. यामुळे आता हा निधी व त्यातील कामे जिल्हा परिषदेमार्फतच होणार आहेत. शिवाय जि.प. सदस्य धनराज तेलंग यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मांडला. यावर २०१६-१७ मधील शिष्यवृत्ती वाटपाबाबतची प्रक्रिया आदिवासी आयुक्त व शिक्षणाधिकारी यांची बैठक घडवून आणत निकाली काढणार असल्याची ग्वाही जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिली.
२०१४-१५ मध्ये आर्वी येथे इंदिरा आवास योजना राबविण्यात आली होती. यातील लाभार्थ्यांना आॅफलाईन ठेवण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना घरकुलाची रक्कम प्राप्त झाली नाही. याबाबत जि.प. सदस्य मुकेश कराळे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर तोडगा काढत रक्कम देण्याची ग्वाही देण्यात आली. सभेत प्रत्येक जि.प. सदस्याकडे टेबलवर स्वतंत्र माईक असावा, अशी मागणी जि.प. सरिता गाखरे यांनी केली. शिवाय आरोग्य, महावितरण, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग आदी विषयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर अधिकाऱ्यांनी उत्तरे दिलीत. या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार, इलमे यांच्यासह सर्व सभापती, जि.प. सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.