हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

By चैतन्य जोशी | Updated: September 3, 2022 17:17 IST2022-09-03T17:16:10+5:302022-09-03T17:17:53+5:30

इंदिरा गांधी वॉर्डातील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

2.94 lakhs worth of jewelry including cash robbed in burglary in hinganghat | हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

वर्धा : घराच्या मागील बाजूला असलेल्या दारातून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल २ लाख ९४ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना स्नेहनगर परिसरात इंदिरा गांधी वॉर्डात २ रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

नितेश निळकंठ तेलहांडे हा हरिभाऊ खुनकर यांच्या घरी किरायाने राहतो. त्यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या दारातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत तेथेच ठेवलेल्या कपाटाच्या चावीने लोखंडी कपाट उघडून कपाटात ठेवलेली सोन्याची पोत, २ सोन्याचे गोफ, तीन सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याचे झुमके, लहान मुलींचे सोन्याचे कानातले झुमके, सोन्याचे वेल, सोन्याची पोत, तीन जोड चांदीच्या तोरड्या, लहान मुलांचा चांदीचा कंबरपट्टा, सोन्याचे लॉकेट, सोन्याचे बास्केट आणि ३४ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

चोरी झाल्याचे लक्षात येताच नितेश तेलहांडे यांनी हिंगणघाट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Web Title: 2.94 lakhs worth of jewelry including cash robbed in burglary in hinganghat