अन् माथेफीरुने फोडल्या १० ते १५ दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 18:03 IST2021-11-28T14:30:47+5:302021-11-28T18:03:55+5:30
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात रविवारी सकाळी एका माथेफिरुने अनेकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दुचाकीची तोडफोड केली.

अन् माथेफीरुने फोडल्या १० ते १५ दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा
वर्धा : वेळ सकाळी ७ वाजताची...अन् अचानक घरासमोर दुचाकी, चारचाकी फोडण्याचा आवाज येऊ लागला...बाहेर येऊन पाहतात तर काय एक माथेफीरु शिवीगाळ करून दगडाने गाडीच्या काचा फोडत असल्याचे दिसताच संतप्त नागरिकांनी माथेफीरुला पकडून चांगलाच चोप दिला. रामनगर पोलिसांनी माथेफीरुला ताब्यात घेतले.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मातृसेवा संघ आणि धंतोली परिसर तसेच लगतच्या परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास एक माथेफीरु फिरत होता. त्याने हातात दगड घेऊन अनेकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दुचाकीची तोडफोड केली. नागरिकांनी त्यास हटकले असता त्याला काहीही समजत नसल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत रामनगर पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी माथेफीरुला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची विचारपुस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. नाव, गाव विचारले असता त्याला काहीही समजत नसल्याचे दिसून आले. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती, हे विशेष.