देशवासीयांनी विवाह सोहळे उत्तराखंडात आयोजित करावे, चित्रपट चित्रीकरणाकरिता सर्वोत्तम: PM
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:31 IST2025-03-07T09:29:36+5:302025-03-07T09:31:02+5:30
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशवासीयांनी विवाह सोहळे उत्तराखंडात आयोजित करावे, चित्रपट चित्रीकरणाकरिता सर्वोत्तम: PM
डेहराडून: उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हटले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील मुखवा गावातील गंगादेवीचे मंदिर हे तिचे हिवाळ्याच्या निवासस्थान मानले जाते. तिथे दर्शन घेतल्यानंतर हरसिल येथे एका जाहीर सभेत त्यांनी हे उद्गार काढले.
मोदी यांनी सांगितले की, हिवाळ्यात देशभरात धुक्याचे साम्राज्य असते, त्यावेळी उत्तराखंड मात्र सूर्यप्रकाशात न्हालेले असते. या राज्यात हिवाळी पर्यटनासाठी मोदी यांनी गढवाली भाषेतील ‘घाम तपो पर्यटन’ (सूर्यप्रकाशाचा आनंद घेणारे पर्यटन) हा शब्द वापरला. हे राज्य वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले राहावे, यासाठी उत्तराखंड सरकारने उत्तम धोरण अंमलात आणले आहे.
पर्यटनवृद्धीसाठी या क्षेत्राचा सर्वंकष विचार करायला हवा. हिवाळ्यात उत्तराखंडमध्ये पर्यटक कमी संख्येने येतात, त्यामुळे अनेक हॉटेल, रिसॉर्ट रिकामी असतात. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मंदावते. आता पर्यटन सर्व हंगामात सुरू होणार आहे.
‘चित्रपट चित्रीकरणाकरिता सर्वोत्तम जागा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पारंपरिक नृत्य, संगीत, अन्नपदार्थ या उत्तराखंडच्या वैशिष्ट्यांचा त्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करायला हवा. त्यामुळे आणखी पर्यटक मोठ्या संख्येने उत्तराखंडमध्ये येतील.
केदारनाथ आणि हेमकुंड साहिबसाठी रोप वे बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे तेथील आठ ते नऊ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत करता येईल.
देशभरातील लोकांनी आपले विवाह समारंभ उत्तराखंडमध्ये आयोजिण्याचे तसेच चित्रपट निर्मात्यांनी या राज्यात चित्रीकरण करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. उत्तराखंड चित्रीकरणासाठी उत्तम जागा आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)