'आम्ही स्वदेशासाठी जगू अन् देशासाठी मरू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभक्तीचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:18 IST2025-08-08T17:18:15+5:302025-08-08T17:18:53+5:30
मुख्यमंत्री योगी म्हणाले, तिरंगा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे, स्वदेशी जीवनाचा मंत्र बनला पाहिजे.

'आम्ही स्वदेशासाठी जगू अन् देशासाठी मरू; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशभक्तीचे केले आवाहन
लखनौ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी काकोरी ट्रेन अॅक्शन शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सध्याच्या पिढीला देशभक्ती आणि स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन केले. "स्वदेशी आपल्या जीवनाचे ध्येय बनले पाहिजे, स्वदेशी आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे, आपण स्वदेशीसाठी जगू, आपण आपल्या देशासाठी मरू. जेव्हा भारत देशभक्तीच्या या उंचीने पुढे जाईल, त्यावेळी जगातील कोणतीही शक्ती भारताचे नुकसान करू शकणार नाही. स्वातंत्र्याचा हा संदेश आपल्या सर्वांना या उद्दिष्टाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे",असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी रेल्वे हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या सुपुत्रांना अभिवादन केले. त्यांनी कार्यक्रमस्थळी पिंपळाचे झाडही लावले. त्यांनी लहानांना राखी बांधली आणि मुलींना मिठाई आणि चॉकलेट भेट दिली. त्यानंतर त्यांनी संग्रहालयात सेल्फी आणि फोटोशूट देखील केले. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला, तर काकोरी रेल्वे हल्ल्याच्या घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही केले. या दरम्यान, संस्कृती विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
काकोरी क्रांतिकारकांनी देशभक्तीची ज्योत पेटवली
यावेळी आपल्या भाषमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी येथे ब्रिटीश सरकारच्या तिजोरीवर कब्जा त्यांनी केला. त्या पैशाचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात केला. महान क्रांतिकारकांनी पेटवलेल्या देशभक्तीच्या ज्योतीमुळे १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. रेल्वे कारवाईत फक्त ४६०० रुपये लुटले होते, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता, असंही त्यांनी सांगितले.
"त्या क्रांतिकारकांना खटल्याशिवाय फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सरकारच्या हाती लागले नाहीत, तर त्यांनी स्वतः लढून शहीद झाले. आजचा हा शताब्दी उत्सव त्या महान क्रांतिकारकांना आठवण्याचा एक उत्तम दिवस आहे. आपल्या सध्याच्या पिढीसाठी ही एक नवीन प्रेरणा आहे. १०० वर्षांपूर्वी या महान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आठवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.