Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:45 IST2025-10-28T13:44:50+5:302025-10-28T13:45:44+5:30
CM Yogi Adityanath Inaugurates Yashoda Medicity: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गाझियाबादमध्ये यशोदा मेडिसिटीचे उद्घाटन करण्यात आले.

Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ
गाझियाबाद:उत्तर प्रदेश आरोग्यसेवा क्षेत्रात नवीन उंची गाठत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी गाझियाबाद येथे 'यशोदा मेडिसिटी'च्या उद्घाटन समारंभात दिली. हे रुग्णालय केवळ एनसीआरच नव्हे, तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'यशोदा मेडिसिटी'चे कौतुक करताना म्हटले की, हे केवळ एक रुग्णालय नाही, तर जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांची एक नवीन व्याख्या आहे. राज्यातील लोकांना महागड्या उपचारांसाठी आता दिल्लीला जाण्याची गरज नाही, कारण गाझियाबादमध्ये जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे." राज्य सरकार आरोग्यसेवेच्या क्षेत्रात गुंतवणूक, नावीन्य आणि दर्जेदार सुविधांकडे वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुंतवणूक आणि ५,००० रोजगाराच्या संधी
२०२२ मध्ये 'इन्व्हेस्ट यूपी'सोबत डॉ. पी.एन. अरोरा यांनी सामंजस्य करार करून यशोदा मेडिसिटीची योजना आखली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, अवघ्या तीन वर्षांत हे अत्याधुनिक रुग्णालय प्रत्यक्षात उतरवणे अविश्वसनीय आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधांसह सर्व प्रकारच्या सुपर-स्पेशालिटी सुविधा देईल, ज्यासाठी लोकांना पूर्वी परदेशात जावे लागत असे. या प्रकल्पामुळे ५,००० हून अधिक डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे.
राज्यात ४२ नवीन वैद्यकीय महाविद्यालये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक सुधारणांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशाने या दिशेने लक्षणीय कामगिरी केली आहे. राज्यात आतापर्यंत ४२ नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत. तर, दोन एम्स (गोरखपूर आणि रायबरेली) यशस्वीरित्या कार्यरत आहेत. डबल इंजिन सरकारचे ध्येय प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करणे आणि आरोग्यसेवेत निरोगी स्पर्धा वाढवणे आहे."
द्रौपदी मुर्मू यांचे मानले आभार
या शुभप्रसंगी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आणि यशोदा मेडिसिटीचे अध्यक्ष व एमडी डॉ. पी.एन. अरोरा आणि डॉ. उपासना अरोरा यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन राष्ट्रासाठी प्रेरणा असल्याचे सांगून त्यांचे आभार मानले.