UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:56 IST2025-10-29T18:54:48+5:302025-10-29T18:56:06+5:30
UP Aviation Growth 2025: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'कनेक्टेड यूपी, प्रोस्परस यूपी' या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे उत्तर प्रदेश आता हवाई विकासाच्या नकाशावर अग्रस्थानी आला.

UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'कनेक्टेड यूपी, प्रोस्परस यूपी' या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे उत्तर प्रदेश आता हवाई विकासाच्या नकाशावर अग्रस्थानी आला. केवळ रस्त्यांचे जाळेच नाही, तर हवाई कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी वाहतुकीतही राज्याने विक्रमी वाढ नोंदवली आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेश भारताच्या हवाई विकासात एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
एप्रिल ते ऑगस्ट २०२५ दरम्यान उत्तर प्रदेशातील विमानतळांवर प्रवासी वाहतूक मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १४.६ टक्क्यांनी वाढून ६.०२ दशलक्ष झाली आहे. याच काळात, भारताच्या एकूण हवाई वाहतुकीत उत्तर प्रदेशचा वाटा ३.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ, देशातील प्रत्येक ३० हवाई प्रवाशांपैकी एक प्रवासी आता उत्तर प्रदेशातून प्रवास करतो.
कोविड-१९ महामारीनंतर उत्तर प्रदेशने सर्वात जलद हवाई पुनर्प्राप्ती दर्शवली. फक्त दोन वर्षांत प्रवासी वाहतूक दुप्पट झाली, जो राज्याच्या मजबूत धोरणाचा आणि व्यवस्थापनाचा पुरावा आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनामुळे उत्तर प्रदेशसह शेजारील राज्यांनाही नवीन कनेक्टिव्हिटीच्या संधी उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे ही गती आणखी वाढेल.
अयोध्या, प्रयागराज, वाराणसी ठरले 'स्टार परफॉर्मर'
| शहर (विमानतळ) | वाढीचा दर (२०२३-२४ ते २०२४-२५) | प्रवाशांची संख्या (२०२४-२५) |
| प्रयागराज | ७६.४% | १.०७७ दशलक्षाहून अधिक |
| वाराणसी | ३४.४% | ४० दशलक्षाहून जास्त |
| गोरखपूर | २७.६% | ८.६७ लाखांहून अधिक |
| अयोध्या | ५ पट वाढ | १.१ दशलक्षाहून अधिक (२०२३-२४ मध्ये ०.२० दशलक्ष) |
व्यापार आणि निर्यातीतही महत्त्वाची भूमिका
उत्तर प्रदेश केवळ प्रवासी वाहतुकीतच नाही, तर व्यापार आणि निर्यातीसाठीही प्रमुख केंद्र बनत आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२४-२५ पर्यंत, राज्याच्या हवाई मालवाहतुकीने १९.१ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर नोंदवला आहे. मालवाहतूक ५.८९ हजार मेट्रिक टनांवरून २८.३६ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. एप्रिल-ऑगस्ट २०२५ मध्ये कानपूर (१६५ टक्के) आणि आग्रा (२४७ टक्के) या औद्योगिक केंद्रांनी मालवाहतुकीत विक्रमी वाढ नोंदवली, जी राज्याच्या औद्योगिक समूहांचे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीशी होणारे एकत्रीकरण दर्शवते.
रोजगार मिळणार, गुंतवणूक वाढणार
उत्तर प्रदेश नागरी विमान वाहतूक संचालक इशान प्रताप सिंह यांच्या मते, हवाई कनेक्टिव्हिटी हे केवळ वाहतुकीचे साधन नसून रोजगार, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी एक नवीन शक्ती आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'प्रत्येक जिल्ह्याला आधुनिक वाहतुकीने जोडणे' हे ध्येय आता प्रत्यक्षात उतरत आहे.