ज्यांनी राज्याला लुटले, त्यांना तुरुंगात आयुष्य काढावं लागेल; CM योगी आदित्यनाथ यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:35 IST2025-09-09T13:34:40+5:302025-09-09T13:35:28+5:30
जर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली, तर भारताला जगातील सर्वात मोठी शक्ती बनण्यास वेळ लागणार नाही असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

ज्यांनी राज्याला लुटले, त्यांना तुरुंगात आयुष्य काढावं लागेल; CM योगी आदित्यनाथ यांचा इशारा
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१६ आणि त्यापूर्वीच्या भरती प्रक्रियांवर जोरदार टीका केली आहे. अनेक भरती प्रकरणे सीबीआयकडे सोपवावी लागली. एका व्यक्तीने आठ ठिकाणी नाव नोंदवून पैसे घेतले होते. चौकशीत हे सर्व एकाच कुटुंबातील लोक होते, जे पैसे घेऊन भरती करायचे आणि ज्यांनी राज्यातील जनतेची लूट केली. ज्यांनी उत्तर प्रदेशला बीमारू राज्य बनवले, त्यांना येणाऱ्या काळात तुरुंगात आयुष्य काढावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.
मुख्यमंत्री योगी म्हणाले ती, यूपीची ओळख धोक्यात आली होती. तरुणांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, मुली असुरक्षित होत्या, व्यापारी हतबल होते आणि शेतकरी आत्महत्येसाठी मजबूर होते. परंपरागत उद्योग बंद होत होते आणि अराजकतेचे वातावरण होते. सणांपूर्वी दंगल उसळायची, पण गेल्या आठ वर्षांत प्रत्येक जिल्हा, समुदाय आणि व्यक्ती उत्साहाने सण साजरे करत आहे. आज सामाजिक सौहार्द आहे, जो राष्ट्रीय एकतेला बळ देतात असं त्यांनी सांगितले. सोमवारी लखनौ येथील लोकभवनात आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १११२ कनिष्ठ सहाय्यक आणि २२ एक्सरे टेक्निशियन यांना नियुक्तीपत्र वितरित केली.
आता वेळवर सुरू होते पारदर्शी भरती प्रक्रिया
आता भरती प्रक्रिया पारदर्शीपणे आणि वेळेवर पूर्ण होते. गेल्या आठ वर्षांत २.१९ लाख पोलिस कर्मचाऱ्यांची भरती झाली. नुकतीच ६०,२४४ पोलिस कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण झाली. पहिल्या पोलिस भरती केली तेव्हा प्रशिक्षण केंद्रांची कमतरता होती. भरती ५० हजार केली परंतु आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर नव्हते. जेव्हा आढावा घेतला तेव्हा फक्त तीन हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण एकाच वेळी होऊ शकत होते हे कळले. पण आता यूपीमध्येच ६०,२४४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रगती
सीएम योगी यांनी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पूर्वी यूपीमध्ये फक्त १७ मेडिकल कॉलेज होते. गेल्या साडेआठ वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रात मेडिकल कॉलेजांची संख्या ८० पेक्षा जास्त झाली आहे. एक जिल्हा, एक मेडिकल कॉलेज ही यूपीची ओळख बनत आहे. याशिवाय, १३५४ स्टाफ नर्स, ७१८२ एएनएम, ११०२ विशेषज्ञ डॉक्टर्स, २७८ सहयोगी प्राध्यापक आणि २१४२ स्टाफ नर्स यांच्या नियुक्त्या झाल्या. यूपीच्या मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली गेली अशी माहिती त्यांनी दिली.
आधी ना डॉक्टर असायचे, ना औषधे...आता सर्व सुविधा मिळतात
यापूर्वी हॉस्पिटल बंद असायचे, डॉक्टर किंवा औषधे उपलब्ध नसायची पण आता प्रत्येक जिल्ह्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यूपी मेडिकल कॉर्पोरेशनद्वारे औषधे उपलब्ध होत आहेत. ५.३४ कोटींहून अधिक कुटुंबांना आयुष्मान कार्डचा लाभ मिळाला असून, ८० लाखांहून अधिक लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी यूपी सरकारने केंद्र सरकारसोबत मिळून ३ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. याशिवाय शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधेची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे ११ लाख कुटुंबांना म्हणजेच ५५ लाख लोकांना लाभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
...तर भारत जगातील मोठी शक्ती बनेल
दरम्यान, काही लोकांना काम नाही. ते स्मार्ट फोनवर केवळ नकारात्मकता पसरवतात. चुकीच्या पद्धतीने फोटो वापरून ते सरकार, विभाग आणि आपली प्रतिमा खराब करतात. त्यांच्यापासून सावध राहा. सर्वांना प्रामाणिकपणे काम करत राहावे. कुठलेही भय मनात बाळगू नये. जर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली, तर भारताला जगातील सर्वात मोठी शक्ती बनण्यास वेळ लागणार नाही असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.