गोरखपूरमध्ये आता उच्चस्तरीय उपचारांसाठी आता सोईसुविधा आणि पैशांची कुठलीही कमतरता नाही आहे, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. येथे सुपर स्पेशालिटी सुविधा आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान-मुख्यमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्मान)सुद्धा आहे. जर कुणाला उपचारांसाठी आयुष्मान योजनेची रक्कम कमी पडली तर मुख्यमंत्री मदत निधी आणि लोकप्रतिनिधींच्या निधीमधून अशा व्यक्तीला मदत दिली जाईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या रीजेन्सी हॉटेलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आधी महागड्या आरोग्य सुविधांचा लाभ घेणं गरीबांसाठी खूप कठीण होतं. मात्र या सुविधा आता सहज उपलब्ध होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने पाच कोटी लोकांना आयुष्मान योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय ज्या लोकांना आयुष्मान योजना किंवा मुख्यमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध आहे. एवढंच नाही तर आमदारांनाही त्यांच्या निधीमधून २५ लाख रुपये उपचारांसाठी देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहायता निधीमधून गेल्या वर्षभरामध्ये ११०० कोटी रुपये उपचारांसाठी दिले गेले आहेत. आधी या सुविधा नव्हत्या आणि सुविधा मिळाल्याच तर त्या वशिलेबाजीच्या माध्यमातून मिळत होत्या.
योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितले की, जनतेसोबत प्रत्येक वेळी उभं राहतं तेच खरं सरकार असतं. जनतेला कुठल्याही भेदभावाविमना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात, हे सरकारचं लक्ष्य असलं पाहिजे. उपचार करण्यासाठी पंतप्रधान मदत निधीमधूनही पैसे मिळतात. आज प्रत्येक ठिकाणी ही सुविधा मिळत आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये विकासपुरक परिवर्तनामुळे व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. आज लोक पैसे खर्च करू शकतात, मात्र केवळ त्यांना सुविधांची आवश्यकता असते. असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान, अडीचशे बेड असलेलं आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं मल्टि सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होणं ही गोरखपूर आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. इथे एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतील. याचा लाभ पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिमोत्तर बिहार आणि नेपाळमधील लोकांनाही मिळेल, असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.