डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:53 IST2024-10-24T18:53:09+5:302024-10-24T18:53:39+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पीडित नाजिम हे त्यांची ७ वर्षांची मुलगी सोफिया हिला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात घेऊन आले. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. तसेच तिचा मृत्यू झाला.
पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार मुलीला रुग्णालयात आणल्यानंतर तिच्यावर उपचारांसाठी त्यांना खूप वेळ वाट पाहायला लावण्यात आली. तसेच डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. यादरम्यान, डॉक्टर टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत राहिले, तर सोफियाची प्रकृती बिघडत गेली. अखेरीस तिने आईच्या मांडीवरच प्राण सोडले. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला शोक अनावर झाला आहे. तसेच आरोपी डॉक्टराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेनंतर पोलीस घटनास्थली दाखल झाले आहेत. तसेच त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांची तक्रार नोंदवून घेतली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनासी संपर्क साधला असता सीएमएस डॉ. अरुण कुमार यांनी सांगितले की, घडलेली घटना अत्यंत दु:खदायक आहे. तसेच या प्रकाराच्या तपासासाठी आम्ही ४ सदस्यांची एक टीम तयार केली आहे. ती आम्हाला लवकरच रिपोर्ट देणार आहे.
या प्रकरणी बदायूँ येथील माजी खासदार आणि आझमगडचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत धर्मेंद्र यादव यांनी दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.