लग्नाची पहिली रात्रच बनली शेवटची रात्र; सकाळी बेडरुममध्ये नवरा-नवरी निपचित अवस्थेत सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:25 IST2023-06-01T13:24:07+5:302023-06-01T13:25:41+5:30
बंद खोलीमध्ये पहिल्याच रात्री असे काय झाले याचा तपास केला जात आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

लग्नाची पहिली रात्रच बनली शेवटची रात्र; सकाळी बेडरुममध्ये नवरा-नवरी निपचित अवस्थेत सापडले...
उत्तर प्रदेशमध्ये लग्नघरात दुसऱ्याच दिवशी खळबळजनक घटना घडली आहे. आनंदात असलेले कुटुंबीय एकाएकी ओक्साबोक्शी रडत आहेत. घटनाच अशी घडलीय की कोणालाही विश्वासच बसत नाहीय. नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह सुहागरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी बेडरुममध्ये सापडले आहेत.
कैसरगंज पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. गुल्लनपुरवा गावचा रहिवासी असलेल्या परशुराम यादव यांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यांची दोन नंबरची मुलगी पुष्पा हिचे बुधवारी लग्न झाले. गोडड़हिया गावातील प्रताप यादव सोबत तिचा मोठ्या धुमधाममध्ये विवाह झाला. पुष्पा प्रतापच्या घरी गेली. पहिली रात्र असल्याने कुटुंबीयांनीही तिकडे लक्ष दिले नाही. परंतू, सकाळी जेव्हा बेडरूममधून कोणीच बाहेर येत नाही हे पाहून दरवाजा वाजविण्यात आला.
तरीही काही प्रतिसाद दिला नाही म्हणून खिडकी उघडून आतमध्ये गेले. आत जाऊन पाहतात तोच दोघेही निपचित पडलेले होते. हे पाहून कुटुंबीयांमध्ये हाहाकार उडाला. लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. एसएचओ राजनाथ सिंह यांनी चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे.
बंद खोलीमध्ये पहिल्याच रात्री असे काय झाले याचा तपास केला जात आहे. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली की विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला याचा शोध घेतला जात आहे.